पाझरखणी-कुंकळ्ळी येथे मस्तवाल रेड्याच्या हल्ल्यात रत्नाकर गावकर (32) हा तरुण ठार झाला. काल सकाळी ही घटना घडली. रत्नाकर गावकर रस्त्यावरून चालत जात असताना एक रेडा धावत अंगावर आला व त्याने शिंगाने रत्नाकरवर हल्ला केला. त्या हल्ल्यात तो जागीच ठार झाला. सदर रेड्याने यापूर्वी कित्येक जणावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. या रेड्याला पकडून बंदोबस्त करावा, अशी मागणी लोकांनी संबंधित सरकारी अधिकाऱ्यांकडे केली होती; पण कोणीच गंभीर दखल न घेतल्याने आज निरपराध गरीब तरुणाचा बळी गेला.