Home बातम्या रेडीचा द्विभुज गणपती

रेडीचा द्विभुज गणपती

0

लाडोजी परब

‘सौंदर्य हे पाहणार्‍याच्या नजरेत असतं’ अशा आशयाची एक म्हण आहे. मात्र रेवतीनगर परिसर आपल्या अमूल्य अशा नैसर्गिक ठेव्यामुळे पाहणार्‍यांच्या नजरेला सौंदर्याचे एक वेगळे परिमाण देतो. हिरवे गर्द माडांचे वन, लाल माती, गरजणारा दर्या आणि रुपेरी वाळू यांचं लेणं लेवून रेेवतीद्वीप उभा आहे. रेवतीपट्टण किंवा रेवतीनगर म्हणजेच आजचे रेडी गाव. जलमार्गातील बंदर म्हणून रेडी सर्वज्ञात आहे. या गावाची महती द्विभुज गणेशामुळे सातासमुद्रपार पोहोचली. रेडीत दोन ठिकाणी द्विभुज गणेश आहेत. एक समुद्रकिनारी आणि दुसरा यशवंत गड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ!

सागरकिनार्‍याचा वरदहस्त लाभलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुका! वेंगुर्ल्याच्या दक्षिणेकडे रेडी गाव आहे. हे रेडी गाव येथील गणपती मंदिरामुळे सर्वदूर प्रसिद्ध पावलेले आहे. ते जागृत देवस्थान आहे. भाविकांचा मोठा ओघ रेडीला येत असतो. रेडीचा गणपती हा स्वयंभू असल्याने भाविकांची अढळ श्रद्धा निर्माण झाली आहे. एका ट्रकचालकाला झालेला दृष्टांत आणि त्यानंतर सापडलेला हा द्विभुज गणेश डोळाभरी पाहण्यासाठी संकष्ट चतुर्थीदिनी भक्तांचा महापूर लोटतो. मॅगनिजच्या खाणीमुळेही हा परिसर प्रसिद्ध आहे. रेडीच्या या प्रसिद्धीमुळे येणार्‍या अनेक भाविकांना आणि पर्यटकांना या रेडी गावात सागरकिनार्‍यावर असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा यशवंतगडाची कल्पना नसते. त्यामुळे पर्यटकांचे पाय यशवंतगडाकडे वळतच नाहीत.

हा किल्ला रेडीचा यशवंतगड म्हणून ओळखला जातो. रेडीला येण्यासाठी वेंगुर्ल्याहून बसेसची सोय आहे. तसेच सावंतवाडीहून आपल्याला शिरोडा गावामध्ये राहण्याची तसेच जेवणाची सोय होऊ शकते. रेडीपासून मालवणपर्यंत रस्ताही उत्तम आहे. रेडी गावापासून एक-दीड किलोमीटर अंतरावर यशवंतगड आहे. रेडीच्या खाडीच्या किनार्‍यालाच लागून असलेल्या लहानशा टेकडीवर यशवंतगड बांधलेला आहे. सोळाव्या शतकात विजापूरच्या आदिलशहाने खाडीच्या मुखाशी मोक्याच्या ठिकाणी हा किल्ला बांधला. इ. स. १६३२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्याला ‘यशवंतगड’ असे नाव दिल्याची इतिहासात नोंद सापडते. कालांतराने १८१९ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला सावंतवाडीकरांकडून जिंकून घेतला होता. समुद्रसपाटीपासून ५० मीटरची साधारण उंची आहे. गावातल्या नारळ-पोङ्गळीच्या बागा आणि त्यात असलेली कोकणी पद्धतीची वैशिष्ट्यपूर्ण घरे ओलांडून आपण यशवंतगडाजवळ पोहोचतो. येथून एक वाट खाली पुळणीकडे जाते. उजव्या हाताला जाणारी पायवाट झाडीत शिरते. या झाडीत शिरल्यावर दोन मिनिटांमधे आपण एका बुरुजाजवळ पोहोचतो. बुरुजाला वळसा घातल्यावर गडाचे प्रवेशद्वार नजरेत भरते. हे कमानयुक्त प्रवेशव्दार आहे. किल्ल्याचे बांधकाम जांभ्या दगडाने केलेले असल्यामुळे प्रवेशद्वारही जांभ्या दगडामध्ये बांधलेले आहे.

प्रवेशद्वारामधून आत गेल्यावर पहारेकर्‍याच्या राहण्याच्या जागांचे अवशेष दिसतात. गडाच्या आत बाहेर मोठ्या प्रमाणात झाडी झुडपे वाढलेली असल्यामुळे आतील सर्व भाग झाकोळून गेलेला आहे. या प्रवेशद्वाराच्या आत शिरल्यावर डावीकडे बालेकिल्ल्याकडे जाणारी पायवाट आहे. ही पायवाट जांभ्या दगडात बांधून काढलेली आहे. बालेकिल्ल्याच्या बाहेर बुजत चाललेला खंदकही दिसतो. येथेही एक प्रवेशद्वार आहे. त्याला काही पायर्‍याही आहेत. येथून आत शिरल्यावर डावीकडे भक्कम बांधणीचा दरवाजा आहे. हा दरवाजा वैशिष्ट्यपूर्ण आहे. दरवाजा बंद असल्यास बाजूला दिंडी दरवाजा केलेला आहे. हा वळणदार मार्ग दरवाजाच्या आत निघतो. अशाप्रकारच्या रचना महाराष्ट्रात दुर्मीळ आहेत. कर्नाटकातील पारसगडाला अशा प्रकारची रचना केलेली आढळते. दरवाजाच्या आत पहारेकर्‍यांसाठी असलेली जागा आहे. ही कमानयुक्त बांधणीची जागा बांधून संरक्षणाच्या दृष्टीने तिची रचना केलेली आहे.

येथे समोरच दोन गोलाकार बुरुजांच्या मधोमध बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. गोलाकार बुरुजांमुळे त्याच्या सौंदर्यात भरच पडली आहे. या बालेकिल्ल्याच्या दरवाजाच्या आत देवड्या असून पुढील मार्ग कातळ कोरून तयार केलेला आहे. बालेकिल्ल्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या दरवाजाच्या मधील जागेत बंदिस्त चौक आहे. या चौकापर्यंत परवानगी शिवाय कोणी पोहोचू शकणार नाही अशी सर्व व्यवस्था जाणीवपूर्वक केलेली आहे. बालेकिल्ल्याच्या तिसर्‍या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डावीकडे मोठी इमारत आहे. सरळ जाणारी वाट तटबंदीकडे जाते. तटबंदीवर झाडी खूप वाढल्यामुळे तटबंदीवर फेरी मारता येत नाही. या तटबंदीवरून ङ्गेरी मारताना काही ठिकाणी पंचवीस ते तीस फूट उंचीची तटबंदी आहे. शत्रूवर मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या केलेल्या दिसतात. मधल्या भागामध्ये भव्य वाडा त्याच्या काही भिंतीसकट उभा असलेला दिसतो. त्याचे दरवाजे, कालौघात नामशेष झालेले असले तरी वाड्याची भव्यता लक्षवेधक आहे.

खरे तर कोकणातील काही किल्ले हे एप्रिल – मे महिन्यात गवत आणि झुडपे कमी झालेली असताना पाहण्यात मजा आहे. कोकणातील किल्ल्यांचे सौंदर्य हे विलोभनीय आहे. या किल्ल्यामुळे रेडी गावचे महत्त्व अधिक वाढले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.