राहुल दौर्‍याचे फलित काय?

0
35

तृणमूल कॉंग्रेस नेत्या ममता बॅनर्जींपाठोपाठ कॉंग्रेस नेते राहुल गांधी नुकतेच गोव्यात धडकले. भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून पायउतार करणे हे ह्या दोन्ही पक्षांचे लक्ष्य आहे. तशा मोठमोठ्या गर्जना ते करीत आहेत. मात्र, त्यासाठी एकत्र येण्याची मात्र दोन्ही पक्षांची तयारी नाही. तृणमूल नेत्या ममता बॅनर्जींना राहुल भेटीसंदर्भात विचारले गेले, तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर कॉंग्रेसकडून त्यांची झालेली निराशाच दर्शवणारे होते. कॉंग्रेस पक्ष महत्त्वाचे निर्णय वेळेत घेत नाही याबद्दलची तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. कॉंग्रेस पक्षाने गेल्या निवडणुकीत आपल्याविरुद्ध पश्चिम बंगालमध्ये उमेदवार उभे केले होते त्याचाही ममतांना राग आहे. त्यामुळे कॉंग्रेस जोवर आपल्यापर्यंत हातमिळवणीसाठी स्वतःहून पुढे येत नाही, तोवर केवळ गोव्यातील प्रादेशिक पक्षांचेच एकत्रीकरण करण्याचे त्यांनी ठरवलेले दिसते. मात्र, अशा प्रकारच्या आघाडीचे नेतृत्व कोणाच्या हाती देणार हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
राज्यातील आगामी निवडणुकीचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. गोव्यातील दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणजे गोवा फॉरवर्ड आणि मगो पक्ष. ह्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सध्या तृणमूलशी संधान बांधलेले आहे. तृणमूलपाशी पैसा आहे, प्रशांत किशोर यांच्या ‘आयपॅक’च्या प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या रणनीतीचे पाठबळही आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये मतविभाजन टाळण्यासाठी एकत्र येण्याच्या दिशेने ह्या प्रादेशिक पक्षांची पावले आता पडू लागलेली दिसतात. अर्थात विजय सरदेसाई यांचे युतीसाठी प्राधान्य कॉंग्रेस पक्षालाच होते व आहे, परंतु दिनेश गुंडुराव यांनी युतीची ग्वाही देऊनही पी. चिदंबरम यांची पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यापासून त्या आघाडीवर काहीही हालचाली न झाल्याने गोवा फॉरवर्डचे नेते बिथरले आहेत. ते ममतांच्या भेटीला ही गेले. प्रसारमाध्यमांशी संवादाचा कार्यक्रम ऐनवेळी तासभर पुढे ढकलून सरदेसाईंच्या शिष्टमंडळाला ममतांनी वेळ दिला होता. गोवा फॉरवर्ड तृणमूलमध्ये आपल्या पक्षाचे विसर्जन करण्यास जरी तयार नसला, तरी आघाडीसाठी हातमिळवणी करण्यास त्याची ना नसल्याने ह्या चर्चेअंती त्यांना आपल्यासमवेत प्रसारमाध्यमांपुढे आणून तिसर्‍या आघाडीच्या एकजुटीचा बिगुल ममतांना वाजवायचा होता. परंतु सरदेसाई तृणमूलच्या व्यासपीठावर न आल्याने तो बारगळला असावा. परंतु गोव्यातील प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन भाजपविरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्याची रणनीती प्रशांत किशोरांच्या मार्गदर्शनाखाली तृणमूलने एव्हाना निश्‍चित केलेली दिसते. यापूर्वी सर्वच्या सर्व चाळीस जागा तृणमूल कॉंग्रेस स्वबळावर लढवील अशी गर्जना पक्षाने केलेली होती. त्या पार्श्वभूमीवर हा बदल लक्षणीय आहे.
राहुल गांधींच्या भेटीने सुस्तावलेल्या कॉंग्रेसमध्ये नवी जान आलेली दिसली. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममधील ‘जागोर’ मधून ऊर्जा घेऊन कॉंग्रेसचे आजवर मनोबल खच्ची झालेले कार्यकर्ते मरगळ झटकून निवडणुकीसाठी सज्ज होऊ लागतील अशी अपेक्षा आहे. राहुल यांनी आपल्या पक्षाच्या निवडणूक रणनीतीचे सूतोवाचही ह्या दौर्‍यादरम्यान केले आहे. मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार आहे ह्यावर त्यांचा रोख दिसला. त्यामुळे भाजपा गोव्याला कोळशाचे केंद्र बनवायला निघाले आहे, दक्षिण गोव्यातील तिन्ही वादग्रस्त प्रकल्प हे उद्योगपतींच्या हितासाठी आहेत, खाणींचा लिलाव विशिष्ट मंडळींच्या घशात खाणी घालण्यासाठी आहे वगैरे वगैरे मुद्दे राहुल यांनी जोरकसपणे मांडले. आपला पक्ष सत्तेवर आला तर खाणी कायदेशीर मार्गाने सुरू करू असेही ते म्हणाले. प्रत्यक्षात राज्यातील खाणी बंद करण्याचा निर्णय शहा आयोगाच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर पर्रीकरांच्याही आधी कॉंग्रेसच्याच तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी पर्यावरणीय परवाने रद्दबातल करून घेतला होता. पुढे पर्रीकरांनी त्याची री ओढली हा भाग वेगळा. शिवाय खाणी बंद होण्यामागे जी बजबजपुरी होती, ती कॉंग्रेसच्याच सत्ताकाळात निर्माण झाली आणि वाढली होती. त्याचीच परिणती खाणी बंद पडण्यात झाली. सत्तेवर आल्यास दक्षिण गोव्यातील तिन्ही प्रकल्प बंद करण्याचे आश्वासनही त्यांनी देऊन टाकले आहे. कॉंग्रेस आपली आपल्यापासून दूर गेलेली विशिष्ट मतपेढी पुन्हा एकत्र करण्यामागे लागलेली आहे हेच त्यांच्या या भूमिकेवरून दिसून येते. विशेषतः दक्षिण गोव्याचा ख्रिस्ती मतदार यावेळी आपली साथ देईल असे कॉंग्रेसला वाटते. मात्र, एक गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट आहे ती म्हणजे ममता जी प्रादेशिक पक्षांची मोट बांधत आहेत तिला आपल्यासोबत जर कॉंग्रेस घेणार नसेल तर मतविभाजन अटळ असेल त्याचे काय हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. मग राहुल दौर्‍याचे फलित काय?