राहुल गांधी यांचा नकार; गेहलोत निवडणूक लढणार

0
6

>> आज कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता

कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे सारे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अध्यक्षपदाच्या दावेदारीवरुन राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. त्यातच आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत, हे काल स्पष्ट झाले. त्यांनी स्वत: या निर्णयाची घोषणा केली. तसेच अध्यक्षपदी निवड झाल्यास ते राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होणार असल्याचेही स्पष्ट केले. कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आपण अध्यक्षपदाच्या शर्यतीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गेहलोत हे अध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अशोक गेहलोत हे आत्तापर्यंत राहुल गांधींचे मन वळवण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे उत्तर देत होते. मात्र गुरुवारी गेहलोत हे राहुल गांधींसोबत केरळमध्ये भारत जोडो यात्रेत सामील झाले. यादरम्यान राहुल गांधींचे मन वळवण्याचा शेवटचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, त्यांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर गेहलोत यांनी आपण कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता सस्पेन्स संपला आहे. अशोक गेहलोत यांच्याशिवाय शशी थरुर, मनीष तिवारी व अन्य काही नेतेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.

गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार
निवडणूक लढवण्याच्या घोषणेसोबतच अशोक गेहलोत यांनी आपण राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एक व्यक्ती एक पद यानुसार मी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे गेहलोत यांनी स्पष्ट केले. पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबतचा निर्णय सोनिया गांधी आणि प्रदेश प्रभारी ठरवतील, असेही ते म्हणाले. त्यामुळे अशोक गेहलोत हे कॉंग्रसचे अध्यक्ष, तर सचिन पायलट हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे.