>> उमेदवारी अर्ज सादरीकरणावेळी दाखल प्रतिज्ञापत्रातून उघड
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राहुल गांधी यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले, त्यातून त्यांच्या संपत्तीचा खुलासा झाला आहे. प्रतिज्ञापत्रानुसार, राहुल यांची जंगम मालमत्ता 9,24,59,264 रुपये आहे, तर स्थावर मालमत्ता सुमारे 11,14,02,598 रुपयांची आहे. अशाप्रकारे त्यांची एकूण संपत्ती 20,38,61,862 रुपये इतकी आहे. याशिवाय त्यांच्यावर सुमारे 49.79 लाख रुपयांचे कर्जही आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधींनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती सुमारे 15 कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. त्यानंतर गेल्या 5 वर्षांत राहुल गांधी यांच्या संपत्तीत सुमारे 5 कोटींची वाढ झाली आहे.
राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे सध्या 55,000 रुपये रोख आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षात राहुल गांधी यांचे एकूण उत्पन्न 1,02,78,680 रुपये होते. याशिवाय राहुल गांधींच्या नावावर एनएसएस, पोस्टल सेव्हिंग आणि इन्शुरन्स पॉलिसीमध्ये सुमारे 61.52 लाख रुपये जमा आहेत.
राहुल गांधी यांनी त्यांच्या नावावर बँकेत 26.25 लाख रुपये ठेव असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. शेअर बाजारात त्यांची एकूण गुंतवणूक 4.33 कोटी रुपये आहे. राहुल गांधी यांची म्युच्युअल फंडात 3.81 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक 15.2 लाख रुपये आहे. तसेच 4.2 लाख रुपयांचे दागिनेही आहेत. त्यांच्याकडे दिल्लीतील मेहरौली येथे दोन शेतजमिनी आहेत. ते आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी या जमिनीचे संयुक्त मालक आहेत. या जमिनी अनुक्रमे 2.346 आणि 1.432 एकर आहेत. ही जमीन त्यांना वारसाहक्काने मिळालेली आहे. या जमिनीची सध्याची किंमत 2,10,13,598 रुपये आहे.
घर नाही; पण गुरुग्राममध्ये 2 कमर्शिअल बिल्डिंग
राहुल गांधींकडे स्वतःचे घर नाही, पण गुरुग्राममध्ये 9 कोटींच्या दोन कमर्शियल बिल्डिंग त्यांच्या नावावर आहेत. त्यांची किंमत 9 कोटींहून अधिक आहे. दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे, राहुल गांधी यांनी 2004 मध्ये पहिली निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांची एकूण संपत्ती 55 लाख रुपये एवढी होती.