भाटलेतील चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळी अटकेत

0
2

पणजी पोलिसांनी चोरट्याच्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला असून, भाटले-पणजी येथे दिवसाढवळ्या झालेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यास यश मिळविले आहे. या चोरी प्रकरणी नवी दिल्ली येथे दोन संशयित चोरटे आणि चोरीचा ऐवज विकत घेणाऱ्या एका सोनाराला अटक केली आहे. तिघाही संशयितांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने दिला आहे.

सविस्तर माहितीनुसार, भाटले पणजी येथे 20 मार्च 2024 रोजी सकाळी 9.30 ते रात्री 8.15 यावेळेत एका घरात चोरीची घटना घडली होती. संशयित आरोपींकडून सुमारे 9 लाख रुपयांचे सोने हस्तगत करण्यात आले आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल दिली.

भाटले येथील चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एका खास पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने सीसीटीव्ही व इतर माध्यमातून केलेल्या तपासानंतर मुंबई, नवी दिल्ली येथे जाऊन संशयितांना ताब्यात घेतले. संशयित यासिन अली (45), मोहम्म्द जमीर (45) या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर चोरीचे दागिने विकत घेणाऱ्या संजय वर्मा नामक सोनाराला अटक केली. त्याच्याकडून 9 लाख रुपयांचे सोने हस्तगत केले आहे, असे कौशल यांनी सांगितले.

संशयित आरोपी नवी दिल्ली येथून रेल्वे मार्गे मडगाव येथे आले. मडगाव येथून एक खासगी वाहन भाडेपट्टीवर घेऊन ते पणजीमध्ये आले. चोरी केल्यानंतर ते रेल्वेने पहिल्यांदा मुंबई व मग नवी दिल्लीला गेले. चोरट्यांनी वाहन भाडेपट्टीवर घेतलेल्या वाहनमालकाची चौकशी केली जात आहे. या चोरी प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.