राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा डंका

0
13

>> ‘गोष्ट एका पैठणी’ची मराठीत तर हिंदीत ‘तान्हाजी’ची बाजी

अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची काल घोषणा आज करण्यात आली. यात मराठी चित्रपट आणि कलाकारांनी बाजी मारली आहे. यंदाही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांचा बोलबाला दिसून आला. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर यांच्या भूमिका असेलल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. तर राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिनं निर्मिती केलेल्या जून या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला असून गोदाकाठ आणि अवांछित या दोन चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

नॉन फिचर्स फिल्म या विभागात कुंकूमार्चन या मराठी चित्रपटाला बेस्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यूचा पुरस्कार जाहीर झाला. तर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी मराठी चित्रपट ‘फनरल’ची निवड करण्यात आली.

चित्रपट पुरस्कारामध्ये अजय देवगण याच्या ‘तान्हाजी’ या चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटाला लोकप्रिय हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार अजय देवगणला जाहीर झाला आहे. ‘तान्हाजी’ सिनेमाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार पटकावले आहेत. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा मराठमोळ्या ओम राऊतने सांभाळली होती.

या पुरस्कारांसाठी दरवर्षी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकने दिली जातात. चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली करण्यात आली होती. त्यासाठी जानेवारी १९५३ ते डिसेंबर १९५३ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची निवड करण्यात आली होती. यावेळी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘शामची आई’ या मराठी चित्रपटाला देण्यात आला होता.