राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरून भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाले असून जेडी (यू) ने काल भाजपच्या भूमिकेशी फारकत घेतली. प्रणव मुखर्जी व हमीद अन्सारी या कॉंग्रेसने पुढे केलेल्या दोन्ही नावांना आमचा विरोध असेल असे भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांचे वक्तव्य वैयक्तिक असून त्याच्याशी आपला पक्ष सहमत नसल्याचे रालोआचे निमंत्रक व जेडी (यू) चे नेते शरद यादव यांनी सांगितले.
समाजवादी पक्ष, तृणमूल कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचा पाठिंबा असेल तर माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांना भाजप पाठिंबा देईल असेही सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. मात्र, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अद्याप चर्चाच झालेली नाही असे शरद यादव यांनी सांगितले. स्वराज यांनी मांडलेले मत हे त्यांच्या पक्षाचे वैयक्तिक मत असल्याचे ते म्हणाले. जेडीयूच्या या भूमिकेमुळे आपल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत सहमती निर्माण करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते राजीवप्रताप रुडी यांनीही पत्रकार परिषद घेऊन सुषमा स्वराज यांनी मांडलेले मत हे भाजपाचे असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मतभेद नसून केवळ अद्याप या विषयावर आघाडीत चर्चा झालेली नाही असे ते म्हणाले.
रालोआचा घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलनेही आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही. भाजपने आपली भूमिका आम्हाला कळवलेली नाही, असे पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी सांगितले. प्रणव मुखर्जी यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी पुढे केले गेले तर त्याचे समर्थन करण्याचा विचार डाव्या पक्षांनी चालवलेला आहे. डॉ. कलाम यांच्या नावाला मात्र डावे पक्ष यावेळीही विरोध करणार आहेत. भाकपचे राष्ट्रीय सचिव डी. राजा यांनी सांगितले की चारही डावे पक्ष ४ मे रोजी बैठक घेऊन आपली भूमिका मांडतील. आपला पक्ष मुसलमान उमेदवाराला राष्ट्रपतीपद देण्यास अनुकूल आहे, असे समाजवादी पक्षाचे नेते कमाल फारुकी यांनी सांगितले. सप, बसप व तृणमूल हे पक्ष राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत एकमताने भूमिका घेऊ शकतात असे ते म्हणाले. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी राज्यसभा उपाध्यक्ष के. रेहमान खान व मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांची नावे राष्ट्रपतीपदासाठी विचाराधीन असल्याचे ते म्हणाले.