दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची दयेची याचिका तामीळनाडूबाहेर सुनावणीस घेतली जावी या एका याचिकादाराच्या विनंतीनुसार सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. ही याचिका यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.
मुरुगन, सन्थान आणि पेरारीसेल्वन यांच्या वतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. हे तिघेही राजीव हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. आपल्या दयेच्या याचिकेवर निर्णय देण्यास राष्ट्रपतींनी ११ वर्षे लावल्याचे कारण देत या तिघांनी आपल्या शिक्षेवर स्थगिती देण्याची याचना केली होती. या तिघा आरोपींच्या बाजूने लढणारे अद्रमुक नेते वायको यांनी या तिघांना वाचवण्यासाठी आपण यापुढेही प्रयत्न करू असे सांगितले. राजीव हत्या प्रकरणातील या तिन्ही आरोपींच्या मद्रास उच्च न्यायालयापुढे असलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयात येत्या १० जुलै रोजी सुनावणीस घेण्याचे निर्देश न्या. जी. एस. सिंघवी यांनी दिले आहेत.
एल. के. व्यंकट यांनी एका याचिकेद्वारे या तिघा आरोपींची सुनावणी तामीळनाडूत झाल्यास त्यात राजकीय हस्तक्षेप होऊ शकतो असा आक्षेप घेतला होता. त्यावर न्यायालयाने हा निवाडा दिला आहे. तिघा आरोपींच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी बाजू मांडली होती. ही सुनावणी तामीळनाडूबाहेर घेण्यास त्यांनी हरकत घेतली होती. अशा प्रकारचे स्थलांतर केवळ भारताचे ऍटर्नी जनरल किंवा याचिकादारच करू शकतात असे त्यांचे म्हणणे होते. तिघाही आरोपींना यापूर्वी फाशीची सजा सुनावली गेलेली असून मद्रास उच्च न्यायालयाने त्यांच्या दयेच्या याचिकेच्या अनुषंगाने तामीळनाडू व केंद्र सरकारास नोटिसा बजावून फाशीस स्थगिती दिली होती.