रामनवमी दिनी वास्कोत दोन गट भिडले

0
14

>> रथयात्रेवर दगडफेक व मारहाणीच्या घटनेमुळे तणाव;
>> वास्को पोलीस स्थानकात परस्परविरोधी तक्रारी दाखल

रामनवमी दिनी उपासनगर-कुठ्ठाळी येथून निघालेल्या रथयात्रेवर वास्कोतील इस्लामपूर-बायणा येथे दगडफेक झाल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी रथयात्रेत सहभागी रामभक्त आणि एका दिव्यांग मुस्लिम व्यक्तीला मारहाण केल्यामुळे वाद आणखी चिघळला. या प्रकरणी रामभक्त व मुस्लिम समाजातर्फे परस्परविरोधी तक्रारी वास्को पोलीस स्थानकात नोंदविण्यात आल्या आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आली आहे.

रामनवमी असल्याने रामभक्तांनी रथयात्रा काढली होती. रथयात्रा इस्लामपूर येथे पोहोचताच दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणारा इस्लामपुरात असल्याची माहिती मिळताच सदर रामभक्तांनी तेथे जाऊन एका तरुणाला मारहाण केली. तसेच त्यांनी येथील मशिदीसमोर जाऊन घोषणा दिल्याने प्रकरण आणखी चिघळले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरणावर नियंत्रण आणले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी परस्पर तक्रारी दाखल झाल्या.

कायदा हातात घेणार्‍यांवर
कडक कारवाई : मुख्यमंत्री

राज्यात कायदा हातात घेऊन समाजात तेढ निर्माण करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिला. वास्को येथे रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक केल्या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन काल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी वास्को येथील नागरिकांच्या एका शिष्टमंडळाला दिले.

दोन पोलीस अधिकार्‍यांची बदली
वास्कोतील या घटनेनंतर वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक नितीन हळर्णकर आणि मुरगाव तालुक्याचे पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांची काल बदली करण्यात आली. त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक म्हणून कपिल नायक यांची, तर उपअधीक्षक म्हणून नीलेश राणे यांची नियुक्ती करण्यात आली.