Home बातम्या रामदेवबाबांचे राजकारण- योग्य की अयोग्य?

रामदेवबाबांचे राजकारण- योग्य की अयोग्य?

0

– मंगेश गावकर, वाळपई 

या भारतभूमीला अनादी काळापासून साधू संतांचे आशीर्वाद लाभलेले आहेत. त्यामुळेच काळाच्या ओघात आज कित्येक संस्कृती नष्ट झाल्या, पण हिंदू संस्कृती आजही संपूर्ण विश्‍वात आपले महत्त्व टिकवून आहे. राष्ट्रावर जेव्हा जेव्हा परकीय संकट कोसळले, तेव्हा तेव्हा या भूमीला या साधूसंतांनीच तारले. आर्य चाणक्य, मेधातिथी, महर्षी देवल, विद्यारण्य स्वामी, समर्थ रामदास स्वामी अशी साधू-संत, संन्याशांची न संपणारी मोठी यादी आहे, ज्यांनी आपल्या तेजोमय विचारातून अनेक महापुरूष घडवून त्यांच्याकरवी अत्याचारांचा नायनाट करून धर्माची पुनर्स्थापना केली. 

ज्या अलेक्झांडरची जग्गजेता म्हणून अफवा पसरविली आहे तो या भारतात नामोहरम झाला. इथेच त्याचा प्रवास जो संपला, तो साधू संतांनी निर्माण केलेल्या अविनाशी प्रतिकारशक्तीमुळेच. ग्रीक भाषेत ते त्यांना जिम्नोसॉफिस्ट म्हणत या यती, संन्याशांबद्दल अलेक्झांडरला एवढी भीती वाटू लागली की, त्याने ग्रीक सैनिकांना आदेशच दिला की, हे साधू संन्याशी जेथे जेथे भेटतील तेथे तेथे पकडून त्यांचा शिरच्छेद करावा. क्षत्रियांच्या खड्‌गापेक्षा या संन्याशांच्या जिभेला जास्त धार आहे हे अलेक्झांडरने जाणले होते.
ब्रिटिशांनी इथे राज्य करताना इथल्या संस्कृतीचे बारकाईने निरीक्षण केले. वेगवेगळी साम्राज्ये जी सर्व विश्‍वाला हादरवून टाकीत ती भारतात आल्यावर नेस्तनाबूत कशी व्हायची याचा सखोल अभ्यास केला. आपल्याला राज्य करायचे तर संस्कृती, धर्म, नीतीमूल्ये ज्या कण्यावर उभी आहेत तो तोडला पाहिजे आणि त्यासाठी पुढच्या पिढ्यांना यापासून दूर नेणे महत्त्वाचे आहे, हे त्यांनी जाणले. गुरूकुल शिक्षण पद्धती नष्ट करून सर्वांवर खालच्या स्तरावर नेणारी गुलामगिरीची शिक्षण पद्धती लादली. स्वतःच्या सोयीचे अनेक कायदे लादून जनतेला वेठीस धरले. मोघलादी काळापासून ब्रिटीश, पोर्तुगाल इत्यादींकडून सतत होत असलेल्या धर्मावर अत्याचारांतही ही संस्कृती टिकून राहिली, ती प्रत्येकवेळी वेगवेगळ्या प्रसंगी अगणित साधू संतांनी दिलेल्या योगदानामुळेच.
रामदेवबाबांनी योग-प्राणायामा मार्फत लोकांमध्ये मानसिक व शारीरिक उत्साह आणला, तसेच देशाभिमान जागविला. त्याचबरोबर ते दुसर्‍या बाजूने भ्रष्ट राजनितीविरुद्ध आवाज उठवून आपले दुहेरी कर्तव्य पार पाडीत आहेत. इथल्या संस्कृतीचे विचारनीतींचे, परंपरेचे रामदेवबाबांनी पुनरुत्थान करून आपली खरी ओळख व स्वरुप दर्शविणारा भारत निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी जो घेतला आहे तो चुकीचा आहे काय?
संन्याशी म्हणजे काय तर त्याने हिमालयात जाऊन तप करावे. निरुपयोगी प्रवचन झाडावे, आपल्याच धुंदीत राहणारे, जप-तप करणारे असे काहीसे चित्र आम्ही उभे करून ठेवले आहे. त्यांनी सभोवतालच्या परिस्थितीबद्दल बोलू नये. घटनेला प्रतिक्रिया देऊ नये आणि राजकारणाबद्दल तर अवाक्षरही काढू नये असे काहींना वाटते. राजकारण हे गलिच्छ. तेथे चांगल्या माणसांनी येऊ नये, असेही आम्ही मानतो. राजकारणाचे वाढते गुन्हेगारीकरण, पैशांचा वाढता प्रभाव, वाढती दंडेली आणि सत्तेची नशा पाहता राजकारण हा शब्द बदनाम झाला आहे. लोकशाही व्यवस्थेत राजकारणाचे स्थान अत्यंत वरचे आहे. दुर्दैवाने आपल्याला त्याचे पावित्र्य राखता येत नाही. त्यामुळे बहुतेक धार्मिक गुरू, बाबा, संत महंत शक्यतो राजकारणापासून दूर राहून आपले कार्य करण्यास पसंत करतात. पण कधी कधी चिखलात उतरूनच चिखल साफ करावा लागतो. रामदेवबाबांनी हे कार्य आपल्या खांद्यावर घेतले हे विशेष म्हणावे लागेल.
रामदेवबाबा यांनी २००२ पासून दूरदर्शनवर आसनांची प्रात्यक्षिके व प्राणायमांचे प्रकार सादर केले. गेल्या दहा-बारा वर्षांत त्यांनी शेकडो योगशिबिरे घेऊन आपल्या सुविचारांतून भारतीयांतली देशभावना जागृत केली. स्व. राजीव दीक्षित यांच्या माध्यमातून परदेशी कंपन्यांची होणारी लूट, बोकाळलेला भ्रष्टाचार, चंगळवाद फैलावणार्‍या दृष्ट प्रवृत्तीवर सडेतोड टीका करीत त्यांच्याविरुद्ध एक आव्हान उभे केले. त्यामुळेच की काय या शक्तीला असहाय्यता उत्पन्न होऊन ते त्यांच्याविरुद्ध अपप्रचार करण्यासाठी सरसावले आहेत.
आरोग्यसंपदा भारत, आध्यात्मिक भारत, राष्ट्रवादी भारत व स्वदेशी भारत या चतुःसूत्रीवर रामदेवबाबांचे कार्य आधारलेले आहे. संपूर्ण भारत योगसाधनेद्वारा रोगमुक्त करण्याचा रामदेवबाबांचा संकल्प आहे. त्यांच्या योगशिबिरामध्ये सर्वसामान्य माणसांबरोबर राजकीय नेतेमंडळी, उच्च पदाधिकारी, डॉक्टर, अभियंते इ. मान्यवरांचाही समावेश असतो. किशनगढ येथे त्यांनी वैदिक संस्कार व आधुनिक शिक्षणावर आधारलेले गुरूकुल व पतंजली योगविद्यापीठ (२००८) दिव्य योगमंदिर ट्रस्ट मार्फत स्थापिले आहे.
रामदेवबाबांच्या योगसाधना आणि योग चिकित्सा या शिबिराने केवळ शारीरिक व्यायाम आहे हा भ्रम नाहीसा झाला आहे. त्यांनी योगाला शारीरिक आरोग्य, रोगनिवारण, मानसिक शांती, आत्मविकास, बौद्धिक चेतना, आध्यात्मिक उन्नती यांचा आधार बनविले आहे. नियमितपणे योग साधना करणार्‍याला याचा फायदा झाला आहे.
साम्यवादी विचारसरणीच्या वृत्तवाहिन्यांना तसेच काही भ्रष्ट राजनेत्यांना इथले सरळविचारी साधुसंन्याशी अडसर वाटतात. साधु संतांची थोर परंपरा असलेल्या या देशातच आज त्यांच्याविरुद्ध बदमामीचे डाव रचले जात आहेत. विविध चित्रपट वाहिन्यांतून त्यांची विटंबना केली जाते. नव्या पिढीत त्यांच्याबद्दल जाणिवपूर्वक विष कालवले जात आहे. आसामाम बापूंसारख्यांना पुढे ठेवून सर्वांनाच ढोंगी, लबाडी, चरित्र्यहीन भासविण्याचे चित्र उभे केले जात आहे. साधुसंतांच्या थोर परंपमेमुळेच हा देश सुजलाम सुफलाम आहे. आपली संस्कृती टिकवून आहे. पण त्यांनाच नष्ट करण्याचा अशा डाव रचू लागला तर याचा भोगवादी, अतिरेकी संस्कृतीत पूर्णतः परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही.