‘राफेल’ करारावर भारत-फ्रान्सचे शिक्कामोर्तब

0
96

फ्रान्सकडून ३६ अत्याधुनिक ‘राफेल’ लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करारावर सोमवारी नवी दिल्लीत भारत आणि फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांदरम्यान औपचारिक अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. हा अत्यंत महत्त्वपूर्ण करार अंतिम टप्प्यात आल्याचे तपशीलवार वृत्त ‘नवप्रभा’ ने उच्चस्तरीय सूत्रांच्या हवाल्याने ११ सप्टेंबरच्या अंकात दिले होते. ११.६ अब्ज युरोची ही विमाने संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण वाटाघाटींअंती ७.८ अब्ज युरोंना भारताला मिळणार आहेत. त्यामुळे भारताचे करोडो रुपये वाचणार असून हवाई दलाची अत्याधुनिक लढाऊ विमानांची गरजही भागेल.

‘राफेल’ची मूळ किंमत फ्रान्सने ११.६ अब्ज युरो एवढी नमूद केली होती. मात्र, ती कमी करण्याच्या दिशेने भारताने व्यापक प्रयत्न केले. स्वतः संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपले गणिती ज्ञानाचे कसब पणाला लावून फ्रान्सशी सातत्यपूर्ण घासाघीस केली. ही विमाने प्रत्यक्ष भारताला पुरविली जातील तेव्हाची युरोची चलनवाढ पाच टक्के गृहित धरली जावी असा फ्रान्सचा आग्रह होता, परंतु भारताने तो जास्तीत जास्त ३.५ टक्केच गृहित धरावा असा आग्रह फ्रान्सपाशी धरला. चलनवाढीचा वस्तुनिष्ठ निर्देशांक विचारात घेऊनच हा दर ठरवावा असा आग्रह संरक्षणमंत्र्यांनी फ्रान्सपाशी धरला. युरोपमधील सध्याच्या आर्थिक मंदीच्या वातावरणाचा फायदा घेत भारताने युरो चलनवाढीचा विद्यमान दर गृहित धरण्यास फ्रान्सला राजी केल्याने भारताचे कोट्यवधी रुपये वाचले आहेत. राफेल वर मिटिऑर ही हवेतून हवेत मारा करणारी व स्काल्प ही हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे बसवण्यात येणार असून मिटिऑरची मारा करण्याची क्षमता दृष्टीपलीकडे (बियॉंड व्हीजन) दीडशे किलोमीटर एवढी आहे. त्यामुळे पाकिस्तानला अमेरिकेने अलीकडेच पुरविलेल्या अमरारपेक्षा ती अधिक क्षमतेची असल्याचे सिद्ध झाले आहे. अमरारची मारा करण्याची क्षमता दृष्टीपलीकडे सुमारे शंभर कि. मी. ची आहे. यापूर्वी भारताजवळील सु – ३० विमानावरील क्षेपणास्त्राची मारा करण्याची क्षमता अवघी ६० कि. मी. होती. त्यामुळे पाकिस्तानची अमरार भारताला आव्हान बनली होती. मात्र मिटिऑर मुळे भारताचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.
राफेल वर हवेतून जमिनीवर मारा करणारी स्काल्प ही अचूक हल्ला चढवू शकणारी (प्रिसिजन स्ट्राइक मिसाईल) क्रुझ क्षेपणास्त्रेही असून त्यांचा पल्ला तीनशे किलोमीटरचा आहे. त्यामुळे मनात आणल्यास भारतातील हवाई हद्दीतून थेट पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणे आता भारताला सहजशक्य बनणार आहे.
विमानाच्या मूळ किंमती खाली आणतानाच त्यावरील शस्त्रास्त्रांची किंमत ७२१ दशलक्ष युरो, भारतासाठी खास केल्या गेलेल्या बदलांची किंमत १.३ अब्ज युरो, देखभाल, सुटे भाग आदींच्या पाच वर्षांच्या कराराचे मूल्य १.४ युरो अशी प्रत्येक विमानावर सुमारे ६४० कोटींची बचत संरक्षणमंत्र्यांच्या अथक प्रयत्नांअंती झाली आहे. अत्याधुनिक राफेल ची खरेदी करणारा भारत हा ईजिप्त व कतारनंतर तिसरा देश बनला आहे. यापूर्वी या लढाऊ विमानांचा प्रत्यक्ष वापर अफगाणिस्तान, लिबिया व सिरियात करण्यात आलेला आहे.

असा आहे करार
राफेल विमानाची मूळ किंमत ३.२ अब्ज युरो असून त्यावर ७२१ दशलक्ष युरो किमतीची अत्याधुनिक क्षेपणास्त्रे बसवण्यात आली आहेत. भारताच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या फेरबदलांवर १.३ अब्ज युरोंचा खर्च करण्यात आला आहे. या विमानांची पुढील पाच वर्षांची देखभाल व सुटे भाग इत्यादींसाठी १.४ अब्ज युरो खर्चिले जाणार असून प्रत्येक विमानाची किंमत भारतीय रुपयांत सुमारे ६४० कोटी आहे.