राणे यांचा व्हाया एनडीए भाजपाप्रवेश?

0
127
  • ल. त्र्यं. जोशी (ज्येष्ठ पत्रकार, नागपूर)

महाराष्ट्रातील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या भावी वाटचालीबाबतच्या ताज्या बातम्या लक्षात घेतल्या तर त्यांचा व्हाया एनडीए भाजपाप्रवेश आता निश्चित झालेला दिसतो. कारण त्याला अनुरूप अशा घटना २५ सप्टेंबर रोजी दिल्लीत व त्यानंतर महाराष्ट्रात घडल्या आहेत.

म हाराष्ट्रातील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या भावी वाटचालीबाबतच्या ताज्या बातम्या लक्षात घेतल्या तर त्यांचा व्हाया एनडीए भाजपाप्रवेश आता निश्चित झालेला दिसतो. कारण त्याला अनुरूप अशा घटना २५ सप्टेंबर रोजी दिल्लीत व त्यानंतर महाराष्ट्रात घडल्या आहेत. खरे तर २५ सप्टेंबर हा दिवस भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी प्रचंड व्यस्त होता. तरीही त्यांनी राणेंना भेटीसाठी वेळ दिला आणि राणेंनीही त्यांच्या भेटीसाठी थोडीशी कळ सोसली, या बाबी बरेच काही सांगून जातात. शिवाय अमित शहा यांना भेटण्यापूर्वी राणे यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी स्वत: दानवे, चंद्रकांतदादा पाटील व राणे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर अमित शहा यांच्या निवासस्थानी स्वत: शहा, मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांच्यात चर्चा झाली. या भेटींबाबत अधिकृतपणे काहीही सांगितले गेले नसले तरी राणे यांनी त्यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी अमित शहा यांना निमंत्रित केले हे जाहीर झाले आहे. याचा अर्थ त्या भेटीनंतर राणे यांनी कोणतेही वक्तव्य केले नसल्यामुळे त्यांचा भाजपाप्रवेश निश्चित असल्याचेच संकेत मिळत होते. पण आलेल्या ताज्या बातम्या लक्षात घेता ते आपला वेगळा पक्ष स्थापन करतील, त्याचा एनडीएत समावेश केला जाईल व त्यानंतर राणेंचा मंत्रिमंडळात प्रवेश होईल अशी तडजोड झालेली दिसते आणि तीच राणे आणि भाजपा या दोघांसाठीही सोयीची ठरू शकते. कणकवलीतील पत्रकार परिषदेत ‘आपण महाराष्ट्राचा दौरा करून कार्यकर्त्यांशी पुढील वाटचालीबद्दल चर्चा करणार आहोत’ असे राणेंनी जाहीर केले होते. एवढेच नव्हे तर त्यांचा नागपूरभेटीचा कार्यक्रमही जाहीर झाला होता. आता दिल्लीतील भेटीगाठीनंतरही त्यांचा महाराष्ट्रातला दौरा कायम राहतो काय, एवढेच स्पष्ट होणे बाकी आहे. दरम्यानच्या काळात हा नवा प्रस्ताव तयार झालेला दिसतो. त्यामुळे आता दसर्‍याच्या दिवशी राणे त्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करणार की, काय एवढाच प्रश्‍न शिल्लक राहिला आहे. कारण महाराष्ट्रात दौरा करण्यासाठी त्यांच्याजवळ वेळही उरलेला नाही.

मात्र तेवढ्याने राणेपुराण संपत नाही. उलट त्यामुळे नवा आणि अधिक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो व तो म्हणजे भाजपाला राणेंना पक्षात वा मित्रपक्ष म्हणून सांभाळता येईल काय? कारण एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचा प्रवेश व राणे यांचा प्रवेश यात गुणात्मक ङ्गरक आहे. कुणी काहीही म्हटले तरी राणेंचे व्यक्तित्व आज महाराष्ट्र स्तरावर प्रतिष्ठित झाले आहे. शिवाय ते अतिशय महत्त्वाकांक्षीही आहेत. तसे महत्त्वाकांक्षी असणे चुकीचे नाही. माणसाने महत्त्वाकांक्षी असलेच पाहिजे. ङ्गक्त ती पूर्ण होण्याची शक्यता किती हेही त्याला तपासता आले पाहिजे. दुर्दैवाने राणे त्यात कमी पडले व त्यामुळेच त्यांची आजची अवस्था झाली. वास्तविक उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले असते तर ते ‘मनोहर जोशी’ नक्कीच झाले नसते. कॉंग्रेसमध्येही आपल्याला मुख्यमंत्री होता येणे शक्य नाही ही वास्तविकता स्वीकारली असती तर कॉंग्रेसश्रेष्ठींचीही त्यांना डिवचण्याची हिंमत झाली नसती. पण राणेंची अवास्तव महत्त्वाकांक्षाच आतापर्यंत त्यांना नडली. भाजपाच्या संदर्भातही ते तसेच गणित मांडणार असले तर त्यांना सांभाळणे भाजपालाही कठीण जाण्याची शक्यताच अधिक आहे.

याचा अर्थ राणे मुख्यमंत्री होण्याला पात्र नाहीत असा मात्र होत नाही. ते त्या पदाला पात्र आहेत याबद्दल शंकाच नाही. ते त्यांनी त्यांना मिळालेल्या अल्पावधीतच सिद्ध करून दाखविले आहे. त्यांच्या दुर्दैवाने नंतरच्या विधानसभा निवडणुकीत युतीचा पराभव झाल्याने त्यांचे मुख्यमंत्रिपद हुकले एवढेच. पण त्यानंतरच्या काळात विरोधी पक्षनेते असतानाही त्यांनी आपले नेतृत्व सिध्द केले आहे. योगायोगाने ते विरोधी पक्षनेते असताना त्या वर्षीच्या अर्थसंकल्पाबाबत त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मला सहभागी होता आले. त्यावेळी त्यांनी केलेल्या विश्लेषणातून त्यांनी आपण मुख्यमंत्री होण्याच्या पात्रतेचे आहोत हे सिद्ध केले होते. त्यामुळे राणेंचा भाजपाप्रवेश भाजपासाठी किती जोखमीचा आणि तेवढाच महत्त्वाचा आहे हे अधोरेखित होते.

आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे, राणेंची प्रतिमा कशीही असली तरी ते एक कुशल संघटक आहेत याबाबत वाद होऊ शकत नाही. गेल्या दोन निवडणुकीत त्यांना व त्यांच्या एका मुलाला पराभूत व्हावे लागले असले तरी कोकणावर त्यांचा प्रभाव आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही. त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांच्या आतापर्यंतच्या सार्वजनिक जीवनात त्यांच्यावर एकदाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. चौकशी तर दूरच. आणि या सर्वांपेक्षा राजकारणात महत्त्वाची ठरणारी बाब म्हणजे ते मराठा असणे. मराठा आरक्षणाबाबत नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले होते व त्या विषयाचा त्यांनी सांगोपांग अभ्यास केला, हे त्यांचे जातीने मराठा असण्यापेक्षा मोठे कारण. राणेंच्या व्यक्तित्त्वाची आणि कर्तृत्वाची ही गुणवत्ता पाहिली म्हणजे त्यांना सांभाळणे किती कठीण आहे याची कल्पना येऊ शकते.

या पार्श्वभूमीवर राणेंचा प्रवेश तेव्हाच सुकर आणि सुसह्य ठरू शकतो जेव्हा राणे मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा सोडायला तात्पुरते तरी तयार होतील. याचा अर्थ असाही नाही की, भाजपा त्यांना केव्हाच मुख्यमंत्रिपद देणार नाही. ङ्गक्त त्यासाठी पुरेशी वाट पाहण्याची तयारी राणेंना ठेवावी लागेल. किती काळ हा प्रश्न लगेच समोर येतो. त्याचे उत्तर द्यायचे झाल्यास किमान २०१९ पर्यंत तरी नाही. म्हणजेच सगळे काही सुरळीत चालले तर त्यांना २०२४ पर्यंत तरी वाट पाहण्याची तयारी ठेवावी लागेल. राजकारणात एवढा काळ ङ्गार मोठा होतो हे खरेच. पण त्याचबरोबर राजकारणात केव्हा काय घडेल हेही सांगता येत नाही. शक्यता हीदेखील आहे की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपले कर्तृत्व सिध्द केले तर केंद्रातही त्यांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते वा राज्यातही मुख्यमंत्रिपदाची संधी प्राप्त होऊ शकते. एवढे मात्र निश्चित की, ते राज्यपालपद स्वीकारण्यास तयार होणार नाहीत. शेवटी प्रश्‍न एवढाच आहे की, भाजपा त्यांना त्यांच्या कर्तृत्वाला साजेशी ऑङ्गर कोणती देते. तेथे राणेंच्या सबुरीचा आणि भाजपाच्या दिलदारपणाचा कस लागू शकतो. भाजपाला जर खरेच बेरजेचे राजकारण करायचे असेल तर तो राणेंना सामावून घेण्याची संधी सोडणार नाही. कारण राणे पक्षासाठी जेवढी डोकेदुखी ठरू शकतात तेवढेच ऍसेटही ठरू शकतात. सांभाळणे तुमच्या कौशल्यावर अवलंबून आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशीष शेलार हल्ली शिवसेनेला शिंगावर घेत आहेतच. पण त्यांच्या जोडीला नारायण राणे आले तर शिवसेनेला हाताळण्याची देवेंद्र ङ्गडणवीसांना चिंताच करावी लागणार नाही. उलट सेनेच्या मागे डबल इंजिन लावल्यासारखे ते होईल.
डावपेचाच्या राजकारणातही राणे आता माहीर झाले आहेत. अन्यथा त्यांनी कणकवलीच्या पत्रकार परिषदेत दसर्‍याचा मुहूर्त जाहीर केला नसता. त्या मुहूर्तापर्यंत भाजपाला न दुखविण्याची पुरेपूर काळजीही त्यांनी घेतली आहे. तरीही आपल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर पर्यायी मार्ग स्वीकारण्याची तयारी त्यांनी सूचित केली आहे. आता ते त्या मुहूर्तावर काय करतात तेवढेच पाहायचे आहे. हा मजकूर रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी प्रसिध्द होत असल्याने तोपर्यंत ते स्पष्ट झालेही असेल. काहीही घडले तरी राणेंना आपण शुभेच्छाच देऊ शकतो.