राणे पिता-पुत्राच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

0
149

विरोधी पक्षनेते तथा आमदार प्रतापसिंह राणे व आमदार विश्‍वजित राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी म्हापसा येथील सीबीआय न्यायालयात सोमवारी दुपारी २.३० वा. होणार होती ती आता शुक्रवार दि. २५ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. पर्यावरण परवान्यासाठी सहा कोटींची खंडणी घेतल्याच्या आरोप प्रकरणी एसआयटीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केल्यानंतर राणे पिता-पुत्राने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
खाण लीज प्रकरणी प्रतापसिंह राणे व आमदार विश्‍वजित राणे यांनी कंपनीकडून खंडणी म्हणून सहा कोटी रुपये घेतल्याचा आरोप दहेज मिनरल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भालचंद्र नाईक यांनी केला होता. याची दखल घेऊन पोलिसांनी राणेंविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल केला होता. एसआयटीने गुन्हा दाखल केल्यानंतर राणे पिता-पुत्राने सीबीआयच्या येथील न्यायालयात ५ रोजी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायाधीश पी. व्ही. सावईकर यांची या अर्जावरील प्राथमिक सुनावणीच्या वेळी एसआयटीला नोटीस बजावून अर्जदारांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. या अर्जावरील सुनावणी ८ जुलै रोजी दुपारी ठेवण्यात आली होती. तोपर्यंत अर्जदारावर कोणतीही कारवाई करण्यास न्यायालयाने निर्बंध घातले होते. अर्जदारांना देशाबाहेर जाण्यास प्रतिबंध केला होता. ८ रोजी सीबीआय न्यायालयात न्यायाधीश पी. व्ही. सावईकर याच्यासमोर सुनावणी सुरू झाल्यावर सरकारी वकील ऍड. प्रसाद कीर्तनी यांनी राणे पिता-पुत्रांच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी चार दिवसांचा वेळ मागितला. न्यायालयाने त्यावेळी सरकारी वकिलांची विनंती मान्य करून पुढील सुनावणी आज २१ रोजी ठेवली होती. त्यावेळी राणे याचे वकील ऍड. शिरीष गुप्ते यांनी अतिरिक्त कागदपत्रे सुर्पूद केली. त्यामुळे काल युक्तीवाद होऊ शकला नाही. तो आता येत्या शुक्रवार दि. २५ जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे.