राज – उद्धव एकत्र

0
7

तब्बल एकोणीस वर्षांनंतर अखेरीस राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. लाखो मराठीजनांनी अगदी साश्रू नयनांनी हा ऐतिहासिक क्षण प्रत्यक्ष अथवा दूरचित्रवाणीवर पाहिला. नुसते हे दोन बंधू एकत्र येतील आणि मराठी माणसाला एकवटतील ह्याची चाहूल लागताच महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र धोरण पहिली इयत्तेपासून लागू करणे हे दोन्ही शासकीय आदेश मागे घेण्याचा शहाणपणा दाखवला. सरकारने जर हट्टाग्रह कायम ठेवला असता, तर निश्चितच समस्त विरोधी पक्षीय एकवटून मराठी माणसाची अभूतपूर्व ताकद पाच जुलैच्या मोर्चामध्ये मुंबईत दिसली असती. त्यामुळे सरकार मागे हटले. त्यामुळे मोर्चा काढण्याचे खरे तर काही कारण उरले नव्हते, परंतु ह्यानिमित्ताने राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या जवळ येण्याची ही संधी मराठी माणसाला दवडायची नव्हती. त्यामुळे सरकारची माघार हा विजय दिवस म्हणून साजरा करण्याची कल्पना पुढे आली आणि दोघेही ठाकरे बंधू एका व्यासपीठावर उभे राहिले. मात्र, मराठीच्या मुद्द्यावर व्यासपीठावर एकत्र आले म्हणजे राजकीयदृष्ट्याही दोन्ही पक्षसंघटना एकत्र येतील असे नव्हे. भले उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलो आहोत आणि एकत्र राहणार अशी त्या दिवशी घोषणा केलेली असली आणि तिला उपस्थित लाखो मराठीप्रेमींनी टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात प्रतिसाद दिला असला, तरी राज ठाकरे यांच्या भाषणात त्याचे कोणतेही सूतोवाच नव्हते. म्हणजेच ते अजूनही त्यांच्या दृष्टीने वेट अँड वॉच हेच सावधगिरीचे धोरण आहे असे दिसते. मात्र, एका व्यासपीठावर हे दोघे एकत्र आल्याने मराठी माणसाला निःसंशय आनंद झालेला आहे. मराठी माणसाची ताकद त्यानिमित्ताने दिल्लीश्वरांना दिसली. केंद्रातील सरकार महाराष्ट्रावर अन्याय करीत आहे, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातेत पळवले जात आहेत, असे एक चित्र गेल्या काही वर्षांत खऱ्या खोट्या कारणांनी का होईना तयार झालेले आहे. मुंबईतील हिरेबाजार गुजरातेत गेला. एअर इंडियाचे मुख्यालय केले, फॉक्सकॉनसारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. ह्या सगळ्यातून मराठी माणसाचे खच्चीकरण केले जात आहे, उपेक्षा केली जात आहे असे एक नॅरेटिव्ह अलीकडे पुढे आणले गेले होते. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारला नव्या शैक्षणिक धोरणानुसार हिंदी हा विषय अगदी पहिलीपासून महाराष्ट्रात तिसरी भाषा म्हणून लावण्याची दुर्बुद्धी झाली. मात्र, जनतेमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यावर हिंदीची सक्ती नसेल, कोणतीही तिसरी भाषा पालक निवडू शकतील अशी सारवासारव सरकारने केली. परंतु तोवर पहिलीपासून तिसऱ्या भाषेला लागू करण्याचा हा विषय गावोगावी पालकांपर्यंत जाऊन पोहोचला होता. त्यातून मराठी भाषेचे महत्त्व कमी करण्याचा डाव आहे अशी महाराष्ट्रात जनभावना झाली. हिंदीभाषक राज्ये मागास आहेत ह्याकडे लक्ष वेधत राज यांनी ती भाषा का शिकायला हवी असा जो सवाल केला तो विचार करण्यासारखा आहे. लहान मुलांच्या मेंदूमध्ये जास्तीत जास्त भाषा शिकण्याची क्षमता असते वगैरे जागतिक संशोधने सांगायला काही सरकारधार्जिणे शिक्षणतज्ज्ञ आता पुढे सरसावलेले दिसत असले, तरी मुळात पहिलीच्या मुलांवर आणखी एक भाषा शिकण्याचे ओझे घालण्याची गरजच काय हा ह्या वादातील मूलभूत प्रश्न होता. पाचवीपासून मुले तिसरी भाषा शिकत आलेली आहेत आणि त्याला कोणी विरोधही केलेला नाही. दाक्षिणात्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र किंवा गोव्यात हिंदी शिकायला कोणाचाही विरोध नाही. मात्र, पहिलीपासून ही तिसरी भाषा हिंदी कोवळ्या मुलांच्या माथी त्यांचे इतर विषय कमी करून मारायची का हा प्रश्न होता. बरे, हिंदीचा देशामध्ये सार्वत्रिक वापर होतो आणि ती शिकली नाही तर जनतेचे अडेल असाही काही प्रकार नाही. देशात सगळ्या व्यवहारामध्ये इंग्रजीचीच गरज भासते. हिंदी ही केवळ परप्रांतीय व्यापाऱ्यांशी बोलण्यापुरती वापरली जाते आणि गरजेपुरती हिंदी बॉलिवूडने आणि हिंदी मालिकांनी, गाण्यांनी सर्वांना शिकवलेलीच आहे. त्यामुळे पहिली ते चौथीच्या मुलांना हिंदी भाषा शिकवण्याची कोणतीही आवश्यकता दिसत नसतानाही केवळ केंद्र सरकारमधील काही घटकांना तसे वाटते म्हणून ती भाषा माथी मारण्याचा प्रयत्न झाल्याने मराठी माणूस संतप्त झाला. राज आणि उद्धव यांनी त्याचे प्रतिनिधित्व केले. एकमेकांवर आजवर भरपूर शरसंधान ह्या दोन्ही बंधूंनी केलेले आहे. तरीही मराठीच्या विषयावर ते एकत्र आले, परंतु राज हे आजवर भाजपशी प्रेमाचे चहापान करीत आले आहेत हे उद्धवसेना विसरलेली नाही हे कालचाच सामनाचा अग्रेलख सांगतो आहे. मराठी माणूस एकत्र आला आहे, तूर्त इतकीच गर्जना करूया असे सामनाचे संपादकीय ज्याअर्थी सांगते, त्या अर्थी मनातील शंका अजूनही मिटलेल्या नाहीत. राज यांच्या भाषणात तर ह्यापलीकडच्या एकजुटीबाबत अवाक्षर नव्हते. त्यामुळे उद्धव जरी एकत्र आलो, एकत्र राहणार म्हणत असले तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. मराठीच्या मुद्द्यापलीकडे ही एकजूट टिकणार का, त्याबाबत दोघांमधील समझोता कसा असेल असे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत.