राज्यात ९ दिवसांत ६३७ ट्रक मासळी आयात

0
81

>> आक्षेपार्ह काहीच आढळले नाही : विश्‍वजीत राणे

राज्यात मागील नऊ दिवसात परराज्यातून सुमारे ६३७ ट्रक मासळी आणण्यात आली आहे. एफडीएला परराज्यातून आयात मासळीच्या तपासणीमध्ये काहीच आक्षेपार्ह आढळून आलेले नाही, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी काल पत्रकारांना पाठविलेल्या संदेशाद्वारे दिली.

शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत पोळे काणकोण येथील तपासणी नाक्यावर ५१ मासळीवाहू ट्रकांची तपासणी करण्यात आली. तर पत्रादेवी – पेडणे नाक्यावर ७ ट्रकांतील मासळीची तपासणी करण्यात आली आहे, असेही राणे यांनी सांगितले.

पोळे तपासणी नाक्यावर आत्तापर्यंत ५३३ ट्रकातील मासळीची तपासणी करण्यात आली आहे. पत्रादेवी नाक्यावर १०४ ट्रकातील मासळीची तपासणी करण्यात आली. पोळे नाक्यावर जास्त प्रमाणात मासळी घेऊन येणारे ट्रक येत आहेत. कर्नाटकातील कारवार, अंकोला, मंगलोर या भागातील मासळी आणली जाते. तसेच केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या भागातील मासळीवाहू ट्रक सुध्दा पोळे नाक्यावरून गोव्यात प्रवेश करतात. पत्रादेवी तपासणी नाक्यावर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील मालवण, रत्नागिरी आदी भागातील मासळीवाहू ट्रक येतात, असे राणे यांनी सांगितले.

एफडीएकडून मासळीची योग्य प्रकारे तपासणी केली जात आहे. ट्रकातील प्रत्येक मासळीचा बॉक्स तपासणे शक्य नसल्याने निवडक नमुने घेऊन मासळीची तपासणी केली जात आहे. असे राणे म्हणाले.