राज्यात ८ पासून नवीन निर्देश लागू

0
121

>> सध्या रात्रीच्या संचारबंदीत कपात

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने लॉकडाऊन ५.० साठी नवीन निर्देश जारी केल्यानंतर गोवा सरकारकडून आवश्यक नवीन निर्देश ८ जूनपासून जारी केले जाणार आहे. तूर्त, राज्यातील रात्रीच्या संचारबंदीमध्ये कपात करण्यात आली असून रात्री ९ ते सकाळी ५ यावेळेत संचारबंदी लागू राहणार आहे, अशी माहिती महसूल सचिव संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

केंद्रीय गृहमंत्रालयाने नवीन निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार रेस्टॉरंट, हॉटेल्स, धार्मिक स्थळे खुली केली जाणार आहे. नवीन निर्देशांची कार्यवाही ८ जूनपासून केली जाणार आहे. या नवीन निर्देशाच्या कार्यवाहीसाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून नवीन निर्देश जारी केले जाणार आहे. केंद्रीय मंत्रालयाने नवीन आर्थिक व्यवहार सुरू करण्यासंबंधीचे निर्देश जारी केल्यानंतर गोवा सरकारकडून गरजेनुसार निर्देशांमध्ये आवश्यक बदल केला जाणार आहे, असेही कुमार यांनी सांगितले.

राज्यातून ८७ हजार मजूर रवाना
राज्यातून आत्तापर्यंत ४३ श्रमिक रेल्वे गाड्यातून ८७ हजार मजुरांना परत पाठविण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात मजुरांना रेशन, खाद्यपदार्थ आदींचा पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर आपल्या गावी परतण्यास इच्छुक मजुरांची नोंदणी करण्यात आली. सुमारे १.४ लाख मजुरांनी गावी जाण्यासाठी नोंदणी केली आहे,असेही कुमार यांनी सांगितले.

७८६ गुन्ह्यांची नोंद
लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात ७८६ गुन्ह्यांची नोंदणी करण्यात आली आहे. लॉकडाऊनचा भंग केल्याप्रकरणी आत्तापर्यंत १४३२ जणांना अटक करून सुटका करण्यात आली आहे. तर, ४८७ वाहने जप्त केल्याचे सचिव कुमार यांनी सांगितले.
राज्यात प्रवेश करणार्‍या नागरिकांसाठी निर्देशामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. येत्या ८ जूनपर्यंत जुन्याच निर्देशांची कार्यवाही केली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी दिली.