राज्यात ७ बळींसह १४६५ रुग्णांची नोंद

0
9

>> सक्रिय रुग्णसंख्या १६ हजारांच्या खाली

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन १४६५ कोरोनाबाधित आढळून आले असून, आणखी ७ कोरोना बळींची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३३.९३ टक्के एवढे आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्येत घट होत असून, सक्रिय रूग्णसंख्या १६ हजारांच्या खाली आली आहे.

राज्यात कोरोना बळीच्या संख्येत वाढ होत असून, गेल्या चोवीस तासात आणखी ७ कोरोना बाधितांचा बळी गेला आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३६३० एवढी झाली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून स्वॅब तपासणीमध्ये घट झाली आहे. चोवीस तासांत नवीन ४३१७ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील १४६५ नमुने बाधित आढळून आले. राज्यात चोवीस तासांत ४२ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले असून, बर्‍या झालेल्या २५ जणांना इस्पितळातून घरी पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, राज्यात मागील १६ दिवसांत २१ हजार ५१२ लाभार्थींना कोविड बूस्टर डोस देण्यात आला आहे. आत्तापर्यंत केवळ १७.३० टक्के लाभार्थींनी बूस्टर डोस घेतला आहे. बूस्टर डोससाठी १ लाख २४ हजार ३६२ जण पात्र आहेत. दुसर्‍या बाजूला १५ ते १८ या वयोगटातील ७९.८५ टक्के लाभार्थींना लस देण्यात आली आहे. आत्तापर्यंत ५९ हजार ०८८ मुलांना लस देण्यात आली आहे.

३९३६ जण कोरोनामुक्त
मागील चोवीस तासांत नवीन बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मागील चोवीस तासांत आणखी ३९३६ जण कोरोनामुक्त झाले असून, आता सक्रिय रुग्णसंख्या १५ हजार ७१९ एवढी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.७३ टक्के एवढे आहे.