राज्यातील कोरोना महामारीची स्थिती गंभीर वळणावर आली आहे. कोरोना रुग्णांचे मृत्यू आणि नव्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत उच्चांकी आणखी ३८ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून उच्चांकी नवे २३२१ रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गेल्या ९ दिवसांत १८३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवे १३ हजार ५३७ रुग्ण आढळून आले आहेत. १२५४ रुग्णांना इस्पितळात दाखल करावे लागले आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १५ हजार २६० झाली आहे. कोरोना बळीची एकूण संख्या १०५५ वर पोहोचली आहे.
३८ जणांचा बळी
राज्यात कोरोना रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. गेल्या १८ एप्रिलपासून कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चोवीस तासांत आणखी ३८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आठ कोरोना रुग्णांचा इस्पितळात दाखल केल्यानंतर चोवीस तासांच्या आत मृत्यू झाला, तर, मडगाव आणि म्हापसा येथील सरकारी इस्पितळात तीन कोरोना रुग्णांना मृतावस्थेत आणण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये २३ रुग्ण आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण गोव्यात खासगी इस्पितळात २ आणि उत्तर गोव्यातील खासगी इस्पितळात एका कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना बळींमध्ये बार्देश तालुक्यातील १३ रुग्णांचा समावेश आहे. मुरगाव, तिसवाडी आणि पेडणे तालुक्यातील प्रत्येकी ४ रुग्ण, सालसेत आणि डिचोली तालुक्यातील प्रत्येकी ३ रुग्ण, फोंडा आणि धारबांदोडा तालुक्यातील प्रत्येकी २ रुग्ण आणि सांगे तालुक्यातील एका रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना रुग्णांच्या संख्येतील वाढ चिंतेचा विषय बनला आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ कायम असताना नागरिकांकडून कोविड एसओपीचे पालन केले जात नाही. सरकारी यंत्रणेला कोरोना रूग्णवाढ आणि कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूवर नियंत्रण ठेवण्यास अजूनपर्यंत यश मिळालेले नाही. मडगाव, कांदोळी, पर्वरी या परिसरात कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. पणजी, म्हापसा, चिंबल, साखळी, डिचोली, पेडणे, शिवोली, वास्को, कासावली, कुठ्ठाळी, लोटली, शिरोडा, फोंडा, खोर्ली, नावेली आदी सर्वच भागांतील रूग्णसंख्येत वाढ होत आहे.
२४ तासांत १७८ जण इस्पितळात
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा तणावाखाली आली आहे. सरकारी इस्पितळामध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी इस्पितळातील खाटा कोरोना रुग्णांसाठी अपुर्या पडत आहेत. चोवीस तासांत नव्या १७८ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
मडगाव, कांदोळी, पर्वरीत रुग्णवाढ
मडगाव, पर्वरी आणि कांदोळीतील रुग्णवाढ कायम असून मडगावातील रूग्णसंख्या १४१८ एवढी झाली आहे. कांदोळी भागातील रूग्णसंख्या १ हजार ३८० आणि पर्वरीतील रुग्णसंख्या १ हजार २७३ एवढी झाली आहे. वास्को येथे ७४५ रुग्ण, म्हापसा येथे ८७८ रुग्ण, पणजी ९६८ रुग्ण, फोंडा ८६३ रुग्ण, कुठ्ठाळी ८९० रुग्ण, चिंबल ५२९ रुग्ण, शिवोली ५०० रुग्ण, कासावली ५११ रुग्ण, साखळी ४२८ रुग्ण आहेत. राज्यातील एकूण कोरोना रूग्णसंख्या ७९ हजार ७९८ एवढी झाली आहे.
बरे होण्याचे प्रमाण ७९.५५ टक्के
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.५५ टक्क्यांवर घसरले आहे.
राज्यातील विद्यालयीन शिक्षकांना
शाळेत न जाण्याचा दिलासा
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकारी आणि अनुदानित विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी पुढील आदेशापर्यंत शाळेत उपस्थिती लावू नये, असा आदेश शिक्षण खात्याचे संचालक दिलीप भगत यांनी काल जारी केला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, शिकवणी करायची असल्यास किंवा वार्षिक निकालपत्रे तयार करण्याचे काम ऑनलाइन पद्धतीने करावे, अशी सूचना करण्यात आली आहे.