मृत्युसत्र सुरूच

0
148

राज्यात कोरोनाने काल २४ तासांत ३८ बळींचा नवा उच्चांक प्रस्थापित केला. त्यात १४ महिला आहेत. तिशी – चाळीशीतील सात जणांचे आयुष्य खुडले गेले आहे. एकीकडे हे मृत्युकांड सुरू असताना दुसरीकडे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि नेते गळ्यांत पुष्पहार घालून टीव्हीवर कालच्या नगरपालिका निवडणुकांतील विजयाच्या फुशारक्या मारण्यात दंग होते. राज्यात चाललेल्या ह्या मृत्युकांडाची पुसटशी वेदना एकाच्याही चेहर्‍यावर काल दिसली नाही. उपमुख्यमंत्र्यांचा सैराट नृत्याविष्कार तर ताजाच आहे!
खरे तर नवे वर्ष सुरू झाले तेव्हा गोव्यात कोरोना उतरणीला लागला होता. जानेवारीमध्ये राज्यात कोरोनाचे २३३४ रुग्ण होते, तर २९ जणांचा मृत्यू ओढवला होता. फेब्रुवारीत ही संख्या आणखी कमी झाली. त्या महिन्यात रुग्णसंख्या १५५७ पर्यंत खाली घसरली होती आणि २८ मृत्यू झाले होते. मात्र, मार्चमध्ये कोरोनाच्या लाटेने पुन्हा उसळी घ्यायला सुरूवात केली. लग्नसोहळ्यांचे, निवडणुकांचे, पर्यटकांचे निमित्त झाले आणि कोरोनाने अशी काही उचल खाल्ली की आता तो आटोक्यात येण्याचे नाव घेताना दिसत नाही. जानेवारीत राज्यात रोज सरासरी ७५ रुग्ण आढळत होते. फेब्रुवारीत ते प्रमाण रोज ५५ रुग्ण एवढे खाली गेले होते, परंतु मार्चमध्ये रोज सरासरी १०५ रुग्ण आढळले आणि मासिक रुग्णसंख्या फेब्रुवारीतील १५५७ वरून थेट दुप्पट होत ३२७८ वर पोहोचली. मार्च महिन्यात मृत्यूही ३५ पर्यंत वाढले. परंतु मार्चमधील उसळी ही तर नुसती सुरुवात होती हे एप्रिल महिन्यात दिसू लागले. गेल्या २६ दिवसांत राज्यात कोरोनाचे रुग्ण मार्चमधील ३२७८ वरून २१ हजार ४९४ वर गेलेले आहेत. म्हणजे रोज सरासरी ८२७ रुग्ण नोंदवले गेले आहेत. गेल्या २६ दिवसांत तब्बल २२४ लोक कोरोनाने मृत्युमुखी पडले. म्हणजे दिवसाला सरासरी नऊ लोकांचा बळी गेला. गेल्या नऊ दिवसांतच तब्बल १८३ जण मृत्युमुखी पडले आहेत, तर साडे तेरा हजार नवे रुग्ण सापडले आहेत. ही रुग्णवाढ आणि हे वाढते मृत्यू केवळ कोरोना विषाणूच्या नव्या रूपाच्या अधिक संसर्गजन्यतेमुळे घडले का? त्यामध्ये जनतेच्या आणि सरकारच्या आजवरच्या बेफिकिरीचा वाटा किती?? जी भीती आम्ही आकड्यांच्या आधारे सप्रमाण आणि परोपरीने वर्तवीत आलो होतो तीच आज खरी ठरलेली नाही काय? मद्रास उच्च न्यायालयाने तामीळनाडूतील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला निवडणूक आयोगाला जबाबदार धरले. गोव्यात ही वाढती रुग्णसंख्या आणि ह्या वाढत्या मृत्युकांडाबद्दल कोणाला जबाबदार धरायचे?
आज राज्यातील चित्र अत्यंत विदारक आहे, परंतु अजूनही कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे शिखर गाठले गेले आहे आणि एवढ्यात ती उतरणीला लागेल असे म्हणण्याचे धाडस करता येत नाही. मुंबईत ती लाट नुकतीच उतरणीला लागली आहे. या महिन्याच्या सुरवातीच्या आठवड्यातील अकरा हजारांवरून ती सध्या तेथे पाच हजारांच्या घरात आहे आणि उतरते आहे. वाढत्या लसीकरणानिशी हेच चित्र गोव्यातही दिसेल अशी आशा करण्यापलीकडे आपल्या हाती काही नाही. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाप्रती पुरेसे गांभीर्य अजूनही आपल्या जनतेमध्येही दिसत नाही आणि सरकारमध्येही. तोंडदेखले निर्बंध आणि त्यातूनही सोईस्कर पळवाटा यामुळे कोरोनाचा हा धगधगता ज्वालामुखी शांत कसा आणि कधी होणार सांगणे अवघड आहे. ही वस्तुस्थिती मांडली की काही मंडळी ‘प्रसारमाध्यमे मृत्यूचा माहौल निर्माण करीत असल्या’ची हाकाटी पिटायला पुढे होतात. परंतु सर्वसामान्य जबाबदार नागरिक आज आपल्या भोवतालच्या परिस्थितीने प्रचंड धास्तावलेला आहे. मूठभर मंडळींच्या बेफिकिरीची फळे तो बिचारा भोगतो आहे. खरे तर हा सृष्टीचा वसंतऋतु, परंतु आज आम गोमंतकीय रखरखीत ग्रीष्माचा दाह सोसतो आहे. रोजचा दिवस रुग्ण आणि मृत्युसंख्येचे नवनवे उच्चांक प्रस्थापित करीत येतो आहे. सुरवातीला हे आकडे ऐकल्यावर हादरल्याच्या प्रतिक्रिया यायच्या. आता त्याही येईनाशा झाल्या आहेत, एवढ्या आपल्या संवेदनाच बोथट होत चालल्या आहेत.
गोव्यात लॉकडाऊनविना आता पर्याय नाही असे काल आरोग्यमंत्र्यांनी ट्वीट केले, पण लॉकडाऊन करणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सरकारमध्येच आज ह्यासंदर्भात एकवाक्यता दिसत नाही. परंतु कोणाची इच्छा असो वा नसो, परिस्थितीच एवढी बिकट बनत चालली आहे की, सक्तीच्या लॉकडाऊनच्या दिशेने आपण अपरिहार्यपणे चाललेलो आहोत. गेले दोन महिने निवडणुकांत दंगलेले, पर्यटनात रंगलेले सरकार वेळीच जागे झाले असते तर ही वेळ खचितच आली नसती!