मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांत लॉकडाऊनबाबत मतभिन्नता

0
131

राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि वाढते मृत्यू या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यात जनतेवरील निर्बंधांसंदर्भात एकवाक्यता नसल्याचे काल पुन्हा एकदा स्पष्ट झाले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ट्वीटरवरून राज्यात आता तरी कडक लॉकडाऊन अत्यंत गरजेचे आहे असे परखड मत व्यक्त केले. मात्र, त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लॉकडाऊनचा तूर्त विचार नसून निर्बंधांचे पालन होईल हे पोलिसांद्वारे पाहिले जाईल अशी भूमिका मांडली. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या मताशी मुख्यमंत्री सहमत नसल्याचे स्पष्ट झाले.

आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी अर्थव्यवस्था महत्त्वाची आहेच, परंतु त्यापेक्षा नागरिकांचे प्राण अधिक महत्त्वाचे आहेत अशी प्रतिक्रिया ट्वीटरवर व्यक्त केली होती, परंतु सद्यस्थितीत लॉकडाऊन करण्याचा विचार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

लॉकडाऊनचा तूर्त विचार नाही ः मुख्यमंत्री
राज्यात रुग्ण व मृत्युसंख्या वाढत असली तरी अद्याप सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही. पोलीस आणि प्रशासनाला नव्या कोविड नियमावलीचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल संध्याकाळी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात कोविड स्वॅबच्या नमुन्याच्या चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तसेच, कोरोना रुग्ण उपचारासाठी इस्पितळात उशिरा दाखल होत असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांनी त्वरित इस्पितळात दाखल व्हावे, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केला. कोरोनाची दुसरी लाट खूप धोकादायक आहे. कोरोनाचा फैलाव गोव्याबाहेरून आलेल्या लोकांमुळे होत नसून. स्थानिक पातळीवर जास्त नागरिक एकत्र येत असल्याने होत आहे. पोलीस यंत्रणेला लग्नसमारंभ, कार्यक्रम बंद पाडण्यास भाग पाडू नका. राज्यात एका दिवशी झालेल्या ३८ रुग्णांच्या मृत्यूनंतर तरी लोकांनी डोळे उघडावेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महिनाभर तरी लॉकडाऊन हवे ः आरोग्यमंत्री
राज्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी किमान महिनाभर लॉकडाऊन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, असे परखड मत आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल व्यक्त केले. राज्यातील कोरोनाग्रस्त नागरिकांचे आणखी बळी देणे योग्य होणार नाही. आपण मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊनबाबत विनंती करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. कोरोनाची साखळी मोडून काढण्यासाठी लॉकडाऊनची आवश्यकता आहे. आर्थिक व्यवसाय चालू ठेवणे जेवढे महत्त्वाचे आहे. तेवढेच नागरिकांचे प्राण वाचविणे सुध्दा महत्त्वाचे आहे, असेही राणे म्हणाले.