राज्यात ११ बळींसह ६१३ कोरोनाबाधित

0
260

>> गेल्या १५ दिवसांत १२३ मृत्यू

राज्यात चोवीस तासांत कोरोना पॉझिटिव्ह आणखी ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद काल झाली असून नवीन ६१३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यातील कोरोना बळीची संख्या आता ३१५ एवढी झाली असून सप्टेंबर महिन्याच्या १५ दिवसांत १२३ जणांचा बळी गेला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ५११ एवढी झाली असून सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ५१०२ एवढी झाली आहे.

गोमेकॉत ९ जणांचा मृत्यू
बांबोळी येथील गोमेकॉमध्ये ९ रुग्ण आणि मडगाव येथील ईएसआय कोविड इस्पितळात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गोमेकॉमध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा इस्पितळात दाखल केल्यानंतर केवळ एका तासांत मृत्यू झाला आहे. डिचोली येथील २७ वयाची महिला रुग्ण, मडगाव येथील ६८ वर्षांचा पुरुष रुग्ण, पारोडा सासष्टी येथील ८३ वर्षांचा पुरुष रुग्ण, वास्को येथील ८२ वर्षांचा पुरुष रुग्ण, केपे येथील ८२ वर्षांची महिला रुग्ण, बागा कळंगुट येथील ३४ वर्षांचा पुरुष रुग्ण, सांताक्रुझ येथील ५२ वर्षांचा पुरुष रुग्ण, दाभोळी येथील ५५ वर्षांचा पुरुष रुग्ण, खोर्ली म्हापसा येथील ९० वर्षांचा पुरुष रुग्ण, पर्वरी येथील ७९ वर्षांचा पुरुष रुग्ण आणि आमोणा-डिचोली येथील ७२ वर्षांच्या महिला रुग्णाचे निधन झाले आहे.
बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत कोविड नमुन्याची संख्या वाढल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोविड प्रयोगशाळेत १९०० नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.

काल ४४६ कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखी ४४६ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २० हजार ०९४ एवढी झाली आहे. कोरोना सौम्य लक्षणे असलेल्या ४३४ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला असून होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या १०,२९७ एवढी झाली आहे. इस्पितळ आयसोलेशनमध्ये आणखी १७९ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

उशिरा उपचारांमुळे मृत्यू
कोरोना विषाणूची लक्षणे असताना कोविड चाचणीला टाळाटाळ करणे, कोरोनाची लक्षणे गंभीर बनल्यानंतर इस्पितळात उपचारांसाठी धावाधाव करणे, इस्पितळात उशिरा दाखल झाल्याने कोविड उपचार करण्यात अडचणी निर्माण होत असल्याने कोरोना मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष आरोग्य खात्याने काढला आहे.

पणजीत नवे २७ रुग्ण
पणजी उच्च प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत नवे २७ पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. पणजीतील रुग्णांची संख्या २९० एवढी झाली आहे. पणजी परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक बनली आहे. फोंडवे रायबंदर, करंजाळे, मिरामार, टोक, मळा, सांतइनेज, एमजी रोड पणजी, रामभुवनवाडा – रायबंदर, नेवगीनगर, आल्तिनो या भागात नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.