घरी विलगीकरणात असलेल्यांवर डॉक्टरद्वारे देखरेख ः विश्‍वजित

0
330

राज्यातील होम आयसोलेशनखालील रुग्णांना योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्यावर वैद्यकीय अधिकार्‍याकडून देखरेख ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यासाठी राज्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र (पीएचसी), सामाजिक आरोग्य केंद्र (सीएचसी), उच्च प्राथमिक आरोग्य (यूएचसी) केंद्रात एमपीएचडब्लू आणि एएनएमएसची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी काल दिली.

आरोग्यमंत्री राणे यांनी आरोग्य खात्याच्या अधिकार्‍यांशी कोरोना सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांच्या होम आयसोलेशन व्यवस्थापनावर सविस्तर चर्चा केली. राज्यातील होम आयसोेलेशनखालील कोरोना रुग्णांना वरच्यावर वैद्यकीय मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

होम आयसोलेशनखालील रुग्णांच्या कोरोना लक्षणांमध्ये वाढ झाल्यास आरोग्य अधिकारी स्वतः रुग्णाशी चर्चा करून गरज भासल्यास निकटच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात दाखल करू शकतात, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले. होम आयसोलेशन रुग्णांसाठी योग्य आरोग्य सेवा देण्यासाठी एक सक्षम यंत्रणा तयार केली जात आहे. कोरोना रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले.