राज्यात सातवी, आठवीचे प्रत्यक्ष वर्ग गुरुवारपासून सुरू

0
29

>> सरकारची परवानगी; पहिली ते सहावीच्या वर्गांबाबत तूर्त निर्णय नाही

इयत्ता सातवी आणि आठवीचे प्रत्यक्ष वर्ग येत्या गुरुवार दि. २५ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. पहिली ते सहावीपर्यंतच्या वर्गांबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती शिक्षण संचालक भूषण सावईकर यांनी काल दिली.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यासह विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालयांचे वर्ग बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर गेल्या काही महिन्यांत कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानंतर राज्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे राज्यात नववी ते बारावी आणि महाविद्यालयांचे वर्ग यापूर्वीच कोविड मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सुरू करण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यातच राज्य सरकारच्या कोविड तज्ज्ञ समितीने राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या कृती दलाने २२ नोव्हेंबरपासून पहिली ते आठवीपर्यंतचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याची शिफारस केली होती. मात्र राज्य सरकारने पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत रविवारपर्यंत निर्णय घेतला नव्हता. शाळा व्यवस्थापन, पालक व इतरांशी चर्चा करून पहिली ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले होते. विद्यालयाचे पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग एकाच वेळी सुरू करण्यास मान्यता दिल्यास शाळा व्यवस्थापनावर ताण येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण कमी होत असले, तरी राज्यातील विद्यालयाचे वर्ग सुरू करताना सावधगिरी बाळगण्याचे सरकारने ठरवले आहे. त्यामुळे सध्या केवळ सातवी आणि आठवीचे वर्ग सुरू करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. पहिली ते सहावीच्या वर्गांबाबत नंतर निर्णय घेतला जाणार आहे.