राजकीय गोंधळ

0
37

येत्या महिन्यात आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर करू आणि यावेळी आपल्या पक्षाचे सत्तर ते ऐंशी टक्के उमेदवार नवे चेहरे असतील अशी घोषणा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. विरोधकांच्या युतीबाबत काही ठोस न सांगता स्वपक्षाच्या उमेदवारांची घोषणा करण्याचे त्यांनी जे सूतोवाच केले आहे ते बोलके आहे. यावेळी नव्या चेहर्‍यांना म्हणे पक्ष संधी देणार आहे. नव्या चेहर्‍यांना संधी देण्याशिवाय यावेळी कॉंग्रेसपुढे दुसरा पर्याय तरी कुठे आहे? पक्षाचे जुने चेहरे एक तर घाऊकपणे पक्षच सोडून गेले, किंवा निवडणुकीच्या तोंडावर चालते झाले. उरल्यासुरल्यांपैकी काही आता सोडून जाण्याच्या शक्यता चाचपत आहेत. त्यामुळे नव्या चेहर्‍यांना ‘संधी’ देण्याशिवाय कॉंग्रेसपाशी पर्यायच नाही.
कॉंग्रेस पक्षाचे युतीचे दळण काही अजूनही सरता सरत नाही असे दिसते. कॉंग्रेस स्वतःपाशीच ‘बडे भाई’ची भूमिका असल्याच्या भ्रमात आजही आहे. कोणी युतीचा प्रस्ताव दिला तरच त्यावर बोलू, चर्चा करू, ठरवू असा जो आखडूपणा कॉंग्रेस नेत्यांकडून चालला आहे तो त्याचसाठी आहे. एकूण परिस्थितीचा लाभ घेण्याच्या दिशेने पावले टाकण्याऐवजी युतीचे गुर्‍हाळ मांडून कॉंग्रेसने निव्वळ कालापव्यय चालवलेला आहे, जो अंतिमतः भाजपच्या पथ्थ्यावर पडेल. आतापावेतो आपल्याकडे केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युतीचा प्रस्ताव त्यांचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझांनी पाठवलेला आहे, त्यामुळे त्यासंबंधीच चर्चा सुरू आहे असे चोडणकर म्हणत आहेत. म्हणजेच गोवा फॉरवर्ड किंवा अन्य पक्षांना सोबत घेण्यास ते सरळसरळ अनुत्सुक आहेत असेच यातून स्पष्ट होते. कॉंग्रेसने विशेष करून गोवा फॉरवर्डला दिलेल्या अत्यंत थंड्या प्रतिसादाचा फटका त्या पक्षालाही नुकताच बसला. गोवा फॉरवर्डचे कार्याध्यक्ष किरण कांदोळकर कॉंग्रेसशी चाललेल्या या युतीच्या गुर्‍हाळाला काही अंत दिसत नसल्याचे पाहून आपला पक्षच सोडून गेले. तृणमूल कॉंग्रेसच्या गळ्याला हा एक नवा प्रबळ मासा लागेल असे दिसते. आपण हळदोण्यातून लढू आणि आपल्या पत्नीला थिवीतून उमेदवारी मिळावी अशी कांदोळकरांची मागणी आहे. येत्या निवडणुकीत अशी जोडपीच्या जोडपी निवडणूक लढविणार असल्याचे लख्ख दिसू लागले आहे. एका हाताने ओरपणे पुरेसे नाही म्हणून दोन्ही हातांनी ओरपण्यासारखाच हा प्रकार आहे आणि अशी जोडपीच्या जोडपी जर विविध पक्षांच्या मार्फत निवडणुकीत उतरणार असतील तर पुढे गोव्याच्या नशिबी काय वाढून ठेवले आहे हे सांगण्याचीही गरज नसावी.
तिकडे भाजपमध्ये आपल्याविरुद्ध काही शिजत असल्याचा सुगावा लागल्याने बाबूश मोन्सेर्रातनी भाजपपासून अंतर राखायला सुरुवात केली आहे. आपल्या ताळगावमधील घराशेजारील कार्यालयावरील फलकावर आपले, पत्नी व पुत्राचे छायाचित्र झळकवताना भाजपच्या उल्लेखाला वा कमळ निशाणीला त्यांनी सरळसरळ फाटा दिलेला दिसतो. याचा अर्थ स्पष्ट आहे. येत्या निवडणुकीचा रागरंग पाहून काही वेगळे राजकारण भाजपमधील या असंतुष्ट मंडळींमध्ये शिजू लागले आहे. पत्नीच्या उमेदवारीसाठी मायकल लोबोंच्या गर्जना अजूनही चालल्या आहेत. विश्वजित राणे अज्ञातवासात राहून धूर्त राजकीय हालचाली करीत आहेत. बाबू कवळेकरही भाजपने पत्नीला उमेदवारी नाकारली तर वेगळी क्लृप्ती लढवू शकतात. कॉंग्रेसमधून भाजपात आलेल्या सगळ्यांनाच उमेदवारी मिळणे संभवत नाही असे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच केले असल्याने आपले तिकीट कापले जाईल असे वाटणारी मंडळीही या असंतुष्ट, उचापतखोर मंडळींच्या संपर्कात आहे. पूर्वी भाजप अंतर्गत काही मंडळींनी जी-८ दबावगट स्थापन केला होता, तसाच काहीसा हा प्रकार आहे. निवडणुकोत्तर राजकारणाची एकूण दिशा पाहून ही चतुर आखणी चाललेली आहे. उगवत्या सूर्याला दंडवत घालण्याची ही चाललेली तयारी आहे.
आम आदमी पक्षाने घरोघरी चालवलेला संपर्क, तृणमूल कॉंग्रेसने चालवलेली गोळाबेरीज, कॉंग्रेसच्या आसर्‍याला जाऊ पाहणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस, अजूनही युतीच्या निर्णयाचा घोळ घालत बसलेली कॉंग्रेस, एकला चलो रे ची बात करणारा, परंतु भाजपशी सौदेबाजी करू पाहणारा मगो, आणि विरोधकांच्या या बुजबुजाटात अँटी इन्कम्बन्सीचा सामना कसा करावा या चिंतेत असलेला भाजपा असे आजचे एकूण राजकीय चित्र आहे. अर्थात, ही समीकरणे अंतिम नव्हेत. ती बदलू शकतात, नव्हे बदलणार आहेत. अजून बरेच काही घडायचे बाकी आहे. येणारी विधानसभा निवडणूक आजवरच्या निवडणुकांपेक्षा बर्‍याच अंशी वेगळी असणार आहे. ती गोव्याचे किती भले करील हे सांगणे मात्र कठीण आहे.