राज्यात यंदा अभयारण्यापुरतीच व्याघ्र गणना

0
128

राज्यात येत्या ३० एप्रिल ते ६ मे या दरम्यान व्याघ्रगणना हाती घेण्यात येणार आहे, असे काल वनखात्यातील सूत्रानी सांगितले. ह्या गणनेत वाघांबरोबरच अन्य वन्य प्राण्यांचीही गणना करण्यात येणार आहे. गणना होणार असलेल्या मांसाहारी प्राण्यांमध्ये वाघ,बिबटा, कोल्हा, धोल (वन्य कुत्रे) व हैना या प्राण्यांचा. तर शाकाहारी प्राण्यांमध्ये गवारेडा, सांबर, चितळ, भेकर, कुरिंग व पिसय यांचा समावेश असेल.
व्याघ्रगणनेसाठीची पूर्वतयारी ३० एप्रिल रोजी होईल. मात्र, वाघांसह मांसाहारी प्राण्यांच्या प्रत्यक्ष गणनेचे काम १ मेपासून सुरू होणार असून ते ३ मेपर्यंत चालू राहणार आहे. तर शाकाहारी प्राण्याच्या गणनेचे काम ४ मे रोजी सुरू होणार असून ६ मे रोजीपर्यंत चालणार आहे.

गणना अभयारण्यापुरती मर्यादीत
यावेळी ही गणना राज्यातील म्हादई, मोलें, बोंडला, खोतीगाव, नेत्रावळी व भगवान महावीर या अभयारण्यांपुरती मर्यादीत असेल. यापूर्वी खासगी वनक्षेत्रातही ही गणना होत असे वन खात्यातील सूत्रानी सांगितले.

विविध अभयारण्यांसाठी
स्वतंत्र पथकांची स्थापना
या गणनेसाठी विविध अभयारण्यांसाठी स्वतंत्र पथकांची स्थापना करण्यात आली आहे. म्हादई अभयारण्यासाठी १९ पथके, मोलेंसाठी १७ पथके, खोतीगांवसाठी २० पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. अन्य अभयारण्यासाठीही अशाच प्रकारे पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. मुख्य वन संरक्षक अजय सक्सेना, वन्यजीव संवर्धक अनिलकुमार, दोन उपवन संवर्धक, दोन सहाय्यक वन संवर्धक आदी अधिकारी व अन्य ९० वन कर्मचारी अशी वन कर्मचार्‍यांची फौज स्वेच्छेने हे काम करण्यास पुढे येणार असलेल्या लोकांच्या मदतीने हे गणनेचे काम करणार आहेत. दर दिवशी हे काम पहाटे ५.३० वा. सुरू होणार असून दुपारी १२ वाजेपर्यंत चालू राहणार आहे.

२०१४च्या गणनेत ५ वाघ सापडले
२०१४ साली झालेल्या व्याघ्र गणनेत राज्यातील वनक्षेत्रात एकूण ५ वाघांची वस्ती असल्याचे आढळून आले होते, अशी माहितीही वन खात्यातील सूत्रांनी दिली. वन्य प्राण्याच्या ह्या गणनेत प्रत्यक्ष दिसलेली जनावरे, त्यांच्या डरकाळ्या व ओरडण्याचा आवाज, त्यांची विष्ठा, त्यांच्या पावलांचे ठसे, झाडांच्या खोडावर आढळणारे त्यांचे नखांचे ओरखडे, अथवा चावा घेतल्याने झालेले ओरखडे, ह्या तपशीलांचा गणनेसाठी वापर करण्यात येणार आहे.
९ मेपासून कॅमेरे बसवणार
व्याघ्र गणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर ९ मेपासून सर्व अभयारण्यात वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी तसेच त्यांची छायाचित्रे घेण्यासाठी कॅमेरे बसवण्यात येणार असून २५ दिवसपर्यंत हे कॅमेरे वन क्षेत्रात बसवून ठेवण्यात येणार आहेत. नंतर पावसाळ्यापूर्वी ते काढण्यात येतील.