राज्यातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि इतर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस देण्यास कालपासून प्रारंभ करण्यात आला असून, पहिल्या दिवशी १,५१३ जणांना बूस्टर डोस देण्यात आला.
कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी व इतर आजार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोविड प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस दिला जात आहे. आरोग्य खात्याने कोविड बूस्टर डोससाठी २८ हजार जण पात्र असल्याचे जाहीर केले होते. तथापि, पहिल्या दिवशी केवळ दीड हजार जणांनी बूस्टर डोस घेतला. राज्यातील आरोग्य केंद्रे आणि गोमेकॉमध्ये बूस्टर डोस दिला जात आहे. कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेले नागरिक व सरकारी कर्मचारी बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत. दरम्यान, सोमवारी दिवसभरात ६९२३ जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली. ११०८ जणांना पहिला डोस, २७१९ जणांना दुसरा डोस आणि ११४८ मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला.