तिसरी लाट घोंघावतेय… सावधान!

0
11
  • प्रमोद ठाकूर

कोविड महामारीच्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्याची तयारी नागरिकांनी ठेवावी. एक जबाबदार नागरिक बनून कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे आणि कोविडपासून आपले रक्षण करावे. केवळ सरकारी यंत्रणेवर आरोग्य सुरक्षेसाठी विसंबून राहणे योग्य होणार नाही.

राज्यात २८ डिसेंबर २०२१ पासून जास्त प्रमाणात कोरोनाबाधित आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे आरोग्य संचालनालयाने राज्यात कोरोना महामारीची तिसरी लाट सुरू झाल्याचे जाहीर करून नागरिकांना सतर्क केले आहे. ५ जानेवारी २०२२ रोजी तिसर्‍या लाटेतील आतापर्यंतचे सर्वांधिक १००२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यातील टेस्ट पॉझिटिव्हिटी प्रमाण १२.१४ टक्क्यांवर पोहोचले आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी सरकारी पातळीवरून कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कडक उपाय-योजना हाती घेतली जात नाही. केवळ विद्यालयांचे सुरू करण्यात आलेले वर्ग २६ जानेवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॅसिनो व इतर ठिकाणी ५० टक्के उपस्थितीची अट घालण्यात आली आहे. तथापि, या निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी होताना दिसत नाही. कोरोनाचा फैलाव रोखण्याबाबत सरकारी यंत्रणा गंभीर असल्याचे दिसत नसल्याने नागरिकांनाच सतर्क होण्याची गरज आहे.

कोविडची तिसरी लाट येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू होती. आणि खरोखरच कोविडच्या तिसर्‍या लाटेला सुरुवात झाली आहे. मात्र, राज्य सरकारची यंत्रणा कोरोना रोखण्यासाठी योग्य प्रमाणात कार्यरत झालेली दिसत नाही. केवळ बैठका घेऊन काहीच साध्य होत नाही; प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे. सध्या कोविडच्या तिसर्‍या लाटेत हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्‍या बाधितांचे प्रमाण कमी असल्याचे सांगून सारवासारव केली जात आहे.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने गोव्याचे मोठे नुकसान केले आहे. कोरोना रुग्णांवरील अपुर्‍या उपचारसुविधांमुळे अनेक लोकांचा हकनाक बळी गेला. सरकारी हॉस्पिटलांमध्ये रुग्णांसाठी खाटा अपुर्‍या पडू लागल्या. प्राणवायूचीही मोठी समस्या राज्यसरकारपुढे उभी राहिली. अपुर्‍या खाटांमुळे रुग्ण अक्षरशः जमिनीवर झोपत होते. दुसर्‍या लाटेत झालेल्या नुकसानीची भरपाई होणे अशक्य आहे. कोरोनाबाधित उपचारांसाठी उशिरा हॉस्पिटलमध्ये येत असल्याचे सांगून सरकारी यंत्रणेने आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. या पार्श्‍वभूमीवर तिसर्‍या लोटेमुळे राज्यात मोठे नुकसान होऊ नये यासाठी वेळीच योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.

सध्या कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे नागरिकांत परत एकदा चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोना रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये आवश्यक खाटा, प्राणवायू आदींची व्यवस्था आगावू करून ठेवणे गरजेचे आहे. तिसर्‍या लाटेत आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्‍या कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी असले, तरी कुठल्याही क्षणी वाढ होऊन हाहाकार माजू शकतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने कोविड केअर सेंटर सुरू करावी लागतील. कोविडच्या दुसर्‍या लाटेतील बाधित रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर कोविड केअर सेंटर बंद करण्यात आली आहेत.

राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कोविड तज्ज्ञ समितीने कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याची शिफारस केली आहे. सध्या राज्यात रात्रीच्या संचारबंदीवर विचारविनिमय सुरू आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या प्रश्‍नावर बोलताना सांगितले. तथापि, ही शिफारस करून कित्येत दिवस लोटले तरी रात्रीच्या संचारबंदीबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नाही.

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यानंतर देशातील काही राज्यांनी रात्रीची संचारबंदी व इतर निर्बंध लागू केले. परंतु गोव्यात नाताळ व नववर्षाच्या गर्दीच्या काळातही संचारबंदी लागू करण्यात आली नाही. राज्यातील पर्यटन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने, घाईघाईत निर्णय घेतला जाऊ शकत नसल्याचे जाहीर करण्यात आले. रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सरकारची तयारीच नाही. मात्र सध्या संचारबंदी का लागू केली जात नाही याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी प्राधान्यक्रम दिला जात नाही, असेच सध्याचे चित्र दिसत आहे.

देशातील अनेक राज्यांत नाताळ, नववर्षाच्या काळात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. कोरोनाच्या या वाढत्या संख्येमुळे संबंधित राज्यांनी नागरिकांवर निर्बंध घालायला सुरुवात केली. मात्र, गोवा सरकारने अजून कोणत्याही प्रकारचे कडक निर्बंध लागू केलेले नाहीत. त्यामुळे देशाच्या विविध राज्यांतील देशी पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल झाले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यातील किनारी भागात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. या पर्यटकांकडून कोविड नियमांचे पालन केले जात नव्हते. कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सरकारने सावधगिरीचा उपाय म्हणून कडक निर्बंध घालणे गरजेचे होते. राज्यात केवळ विमानतळावर येणार्‍या प्रवाशांची कोविड तपासणी केली जात आहे. मात्र रेल्वेस्थानक, बसस्थानकावर येणार्‍या पर्यटकांची कोविड तपासणी केली जात नाही.

कोविड तज्ज्ञ समितीने कोविडचा फैलाव रोखण्यासाठी केेलेल्या अनेक शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. केवळ विद्यालयांचे वर्ग बंद ठेवण्याच्या शिफारशीची दखल घेण्यात आली आहे. राज्यात रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी लागू करण्याची शिफारस धूळ खात पडली आहे. कोविड निर्बंधांबाबत विचारविनिमय करीत असून आवश्यक निर्णय घेणार असल्याचे उपजिल्हाधिकार्‍यांकडून सांगितले जात आहे. राज्यात १ ते ६ जानेवारी २०२२ या सहा दिवसांच्या काळात ३,८९४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या काळात कोरोना बळींचे प्रमाण कमी आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होणार्‍या बाधितांचे प्रमाण मात्र वाढत आहे. कोविडबाधितांची संख्या वाढत असल्याचे दिसत असतानासुद्धा कोणतेही निर्बंध घालण्यात न आल्याने पुढे आपल्याला संकटाचा सामना करावा लागणार आहे, असेच चिन्ह सध्या दिसत आहे.
राज्य सरकारने कोविड लसीकरणावर भर दिला आहे. मात्र कोविड लस घेतली तरी कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. १५ ते १८ वयोगटातील शालेय मुलांना लस देण्याचे काम सुरू झाले आहे. या मुलांच्या गटातील लसीकरणाबाबत योग्य जागृती करण्यात न आल्याने पालकांकडून नापसंती व्यक्त केली जात आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, ज्येष्ठ नागरिकांना बुस्टर डोस देण्याची तयारी सध्या चालू आहे.

राज्यात ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येतही हळूहळू वाढ होत आहे. विदेशातून येणारे नागरिक ओमिक्रॉनबाधित आढळून येत होते; मात्र आता स्थानिक नागरिकसुद्धा ओमिक्रॉनबाधित आढळून येत आहेत. मडगाव, बार्देश, चिंचिणी, काणकोण येथील स्थानिक रहिवासी ओमिक्रॉनबाधित आढळून आले आहेत. या स्थानिक नागरिकांना प्रवासाची पार्श्‍वभूमी नाही.

राज्यात ओमिक्रॉन व्हेरियंटच्या तपासणीची सोय नसल्याने नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. पुणे येथे पाठविण्यात येणार्‍या नमुन्यांचा अहवाल मिळायला खूप दिवस लागतात. त्यामुळे राज्यात जिनॉम सिक्केन्सिंग यंत्र बसविण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत. कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत जिनॉम सिक्केन्सिंग यंत्र बसविण्यासाठी प्रयत्न सुरू होते; परंतु हे यंत्र उपलब्ध करणे शक्य झाले नाही. राज्यात अनेक ठिकाणी सरकारी हॉस्पिटलांमध्ये सध्या कोविड चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य विभागाने कोविडवरच्या योग्य व्यवस्थापनासाठी जिल्हा, उपजिल्हा पातळीवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची सूचना केली आहे. नियंत्रण कक्षात आवश्यक कर्मचारी, डॉक्टर, साधनसुविधा उपलब्ध करण्याची सूचना केली आहे. गृहविलगीकरणात असलेल्या कोरोना रुग्णांची फोन कॉल्स करून विचारपूस करण्याची सूचना केली आहे.

सध्याची परिस्थिती पाहता राज्यात कोविड नियमांचे पालन होताना दिसत नाही. कोरोना बाधितांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कोविड नियमांचे पालन आवश्यक आहे. मास्कचा काहीजणांकडून वापर केला जातो, तर अनेकांकडून केला जात नाही. मास्कचा वापर न करणार्‍यांवर कारवाईची मोहीम थंडावली आहे. नववर्ष साजरे करण्यासाठी आलेले पर्यटक मास्कचा वापर करताना दिसत नव्हते. तसेच सामाजिक अंतराचे पालनही केले जात नव्हते. किनारी भागातील नववर्षानिमित्त झालेल्या गर्दीचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. किनारी भागात सनबर्न संगीत महोत्सव मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली नाही, तरी लहान प्रमाणात सनबर्न संगीत महोत्सवांचे आयोजन करण्यात आले. किनारी भागातून संगीत रजनीमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राज्यातील बाजारपेठांतसुद्धा कोविड नियमांचे पालन होताना दिसत नाही. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने काहीजणांकडून मास्कचा वापर केला जात असला तरी सामाजिक अंतर नियमाचे पालन केले जात नाही. कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यानंतर उपाययोजना हाती घेण्यात काहीच अर्थ नाही. फैलावात वाढ होऊ नये म्हणून वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

राज्यात विधानसभा निवडणूक येत्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांच्या प्रचारसभा, मेळावे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने कोरोनाचा जास्त प्रमाणात फैलाव होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांच्या प्रचारसभा, मेळाव्यांना मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती असते. कोरोनाचा फैलाव होऊ लागल्याने काही राजकीय पक्षांनी जाहीर प्रचारसभा, मेळावे स्थगित ठेवून घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे. यामुळेही कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांनी घरोघरी न जाता प्रचारासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. कोविडचा वाढता प्रभाव लक्षात घेता नागरिकांनी राजकीय प्रचारसभा, कार्यक्रमांत सहभागी होऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

सध्या राजधानी पणजीसह मडगाव, वास्को, फोंडा, पर्वरी, कासावली, कुठ्ठाळी, म्हापसा या भागांत कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. किनारी भागातसुद्धा बाधितांची संख्या वाढत आहे.

कोविड महामारीच्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्याची तयारी नागरिकांनी ठेवावी. एक जबाबदार नागरिक बनून कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करावे आणि कोविडपासून आपले रक्षण करावे. केवळ सरकारी यंत्रणेवर आरोग्य सुरक्षेसाठी विसंबून राहणे योग्य होणार नाही.