केंद्राकडून राज्यांना कोरोनाबाबत सतर्कतेचा इशारा

0
14

>> कोरोना परिस्थिती झटक्यात बदलण्याची शक्यता; आरोग्य सुविधांवर लक्ष ठेवण्याची सूचना

देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशात सध्या फक्त ५ ते १० टक्के रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे; मात्र ही परिस्थिती झपाट्याने बदलू शकते, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. केंद्र सरकारने राज्यांना याबाबत पत्र लिहिले आहे. दुसर्‍या लाटेत २० ते २३ टक्के सक्रिय रुग्णांना इस्पितळात दाखल करण्याची आवश्यकता होती. या तुलनेत सध्या फक्त ५ ते १० टक्के सक्रिय रुग्णांनाच दाखल करावे लागत आहे, तरी सुद्धा अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

सध्याची कोरोना परिस्थिती पाहता काहीही ठोस सांगता येऊ शकत नाही. येत्या काळात परिस्थिती बदलून भयंकर होऊ शकते. रुग्णालयात दाखल होणार्‍यांची संख्या अचानक वाढूही शकते, असे केंद्र सरकारने पत्रात नमूद केले आहे. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या, हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागलेले रुग्ण, गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्या, ऑक्सिजन बेडची स्थिती, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर सपोर्ट यावर रोज बारकाईने लक्ष ठेवण्याची सूचना केंद्राने केली आहे. देशातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता केंद्र सरकारने राज्यांना या सूचना दिल्या आहेत.

तसेच गरज भासल्यास कोविड लसीकरण केंद्रे रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. कोविड लसीकरण केंद्रांची वेळ निश्चित केलेली नाही. गरजेनुसार त्यांचा वेळ वाढवला जाऊ शकतो, असेही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्र लिहून कळवले आहे.

लसीकरण प्रमाणपत्रावरून मोदींचे छायाचित्र हटवले जाणार
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूरमध्ये या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर या राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र हटवण्यात येणार आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सरकार, उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे या पाच निवडणूक राज्यांमध्ये लोकांना जारी करण्यात आलेल्या कोविड-१९ लसीकरण प्रमाणपत्रांमधून पंतप्रधानांचे चित्र काढून टाकण्यासाठी आरोग्य मंत्रालय कोविन प्लॅटफॉर्मवर आवश्यक फिल्टर्स लावणार आहे, असे अधिकार्‍यांनी म्हटले आहे.