राज्यात उद्यापासून १५ दिवस संचारबंदी

0
135

>> जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत खुली

>> १५ दिवसांतील लग्न, मुंज व इतर समारंभ रद्द

>> औषधालयांवर कोणतेही निर्बंध नाहीत

>> हॉटेल, रेस्टॉरंटमधून पार्सल सेवा सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरू

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येची वाढती साखळी मोडून काढण्यासाठी राज्यात उद्या रविवार दि. ९ मे ते २३ मे २०२१ दरम्यान १५ दिवस संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार आहते. हॉटेल, रेस्टॉरंटमधून पार्सल सेवा सकाळी ७ ते संध्याकाळी ७ यावेळेत सुरू राहील. राज्यातील औषधालयांवर कोणतेही निर्बंध घालण्यात आलेले नाहीत. या संचारबंदीबाबत सविस्तर आदेश शनिवारी संध्याकाळी ४ वाजता जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कोरोना निर्बंध जारी करण्यात आले. परंतु. या निर्बंधांचे योग्य प्रकारे पालन केले जात नाही. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यातील संचारबंदीच्या काळातील १५ दिवसांतील लग्न, मुंज व इतर समारंभ रद्द करावेत. या लग्न, मुंज समारंभामुळे कोरोना रुग्णाचा फैलाव झालेला आहे. राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह टक्केवारी ५१ टक्क्यांवर पोहोचली आहे. नागरिकांनी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचे खापर केवळ सरकारवर फोडून मोकळे होऊ नये. कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यात सरकारी इस्पितळांमध्ये आता वैद्यकीय प्राणवायूची कमतरता नाही. सर्व इस्पितळांत आवश्यक प्रमाणात प्राणवायूची व्यवस्था केली जात आहे. आता सर्व सरकारी आणि खासगी इस्पितळांतून कोरोना रुग्णांवर उपचारांची सोय करण्यात आली आहे. खासगी इस्पितळांतील ८० टक्के खर्च सरकारकडून डीडीएसएसबाय या योजनेतून उचलला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

पर्यटकांना कोविड निगेटिव्ह
प्रमाणपत्र सक्तीचे करणार

परराज्यातून येणार्‍या पर्यटकांना आरटीपीसीआर कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे केले जाणार आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

लॉकडाऊनचीच गरज ः कामत

राज्यातील नागरिक कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे त्रासात असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून लॉकडाऊनची मोठी घोषणा केली जाण्याची अपेक्षा नागरिक बाळगून होते. तथापि, गोवा मुख्यमंत्र्यांनी केवळ संचारबंदीचा घोषणा केली, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल व्यक्त केली. राज्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येची वाढती साखळी मोडून काढण्यासाठी गंभीर निर्णय घेण्याची गरज आहे. सरकारच्या पळवाटा असलेल्या या आदेशातून काहीच साध्य होणार नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या मृतांचे प्रमाण वाढत आहे. राज्यात कोरोना आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकारने कोरोना व्यवस्थापनावर श्वेतपत्रिका जारी केलेली नाही, असेही कामत यांनी म्हटले आहे.

परीक्षांबाबत
लवकरच निर्णय

राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.

घराबाहेर न पडण्याचे आवाहन
कोरोना महामारीची दुसरी लाट धोकादायक आहे. या दुसर्‍या लाटेत युवा वर्गालासुद्धा त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. राज्यात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या ९६ टक्के नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली नाही. नागरिकांकडून लॉकडाऊनची मागणी केली जात आहे. लॉकडाऊनची मागणी करणे सोपे आहे. कोरोना निर्बंधांच्या काळात बरेच लोक नाहकपणे बाहेर फिरत असतात. केवळ २५ टक्के लोकांना दरदिवशी कामधंद्यानिमित्त घराबाहेर पडावे लागते. लोकांना पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचा वापर करावा लागत आहे. नागरिकांनी घरात राहून सुरक्षित राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.