राज्यात उद्यापर्यंत काही ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता

0
15

पुढील दोन दिवस म्हणजेच उद्या मंगळवार दि. २६ एप्रिलपर्यंत राज्यातील काही भागांत गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता पणजी हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने २६ रोजीपर्यंत पिवळा इशारा दिलेला असून या काळात राज्यात ताशी ४० ते ५० किमी या वेगाने वारे वाहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच राज्यातील काही भागांत गडगडाटासह पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात गेल्या काही दिवसांपासून पावसाळापूर्व हवामान सक्रीय बनले असून त्यामुळे काही ठिकाणी आकाशात ‘टर्फ’ बनले आहे. आणि त्यामुळे राज्यात अवकाळी पाऊस कोसळू लागला असल्याचे हवामान खात्याने नमूद केले आहे. या बदलामुळेच शनिवारी पहाटे राजधानी पणजीसह राज्यातील काही भागात पाऊस कोसळला. येत्या २६ एप्रिलपर्यंतही राज्यात असेच वातावरण राहणार असून काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळणार असल्याचे खात्याने नमूद केले आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष रहावे, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, काल पडलेल्या पावसामुळे पणजी व आजूबाजूच्या परिसरात झाडांची पडझड झाली. त्यामुळे काही ठिकाणी वाहनांचीही मोडतोड झाली. दोनापावला येथे एक वृक्ष उन्मळून पार्क करून ठेवलेल्या दुचाकींवर पडल्याने काही दुचाकींची मोडतोड झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी नंतर दुचाकींवर कोसळलेले हे झाड हलवले.