निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील कारवाईने खळबळ
राज्यातील दहा उद्योजकांवर काल आयकर खात्याने छापा मारून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. आयकर अधिकार्यांनी मिरामार, वास्को, पर्वरी आदी एकुण १८ ठिकाणी छापे टाकल्याचे कळते. रात्री उशीरापर्यंत कारवाई चालू होती.
बंगळूर येथून आयकर खात्याची १८ पथके काल सकाळी पहाटे गोव्यात पोचली व त्यांनी संपूर्ण गोव्यात एकाच वेळी छापासत्र सुरू केले. कर्नाटकातील पोलीसही त्यांच्या बरोबर आले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत धाडसत्र चालू होते.
येत्या दि. ३ मार्च रोजी होणार्या गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसच्या काही विद्यमान आमदारांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही उमेदवारी मिळावी म्हणून पक्षावर दबाव आणण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यामुळे कॉंग्रेससमोर उमेदवारांची यादी निश्चित करण्यासाठी पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवरच वरील छापासत्र सुरू असल्याची चर्चा काल शहरात चालू होती. मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी मडगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणाच्या चौकशीलाही गती देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.