राज्यातील सर्व धरणांत पुरेसा पाणीसाठा

0
3

>> जलस्रोतमंत्र्यांची माहिती; पुढील दोन महिने पुरेल पाणी; चिंता नको

राज्यातील सर्व धरणांत पुढील दोन महिन्यांसाठी पुरेल एवढे पाणी असून, त्याबाबत कुणीही चिंता करण्याची गरज नाही, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राज्यात एकूण 7 धरणे असून, त्या सर्व धरणांत उन्हाळ्यासाठी आवश्यक तेवढा जलसाठा आहे. त्यामुळे उन्हाळ्यात राज्याला पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी जी भीती व्यक्त केली जात आहे, ती निरर्थक असल्याचेही शिरोडकर यांनी स्पष्ट केले.

राज्यातील एकूण 7 धरणांपैकी तीन धरणांतील पाणीसाठा हा 50 टक्क्यांखाली आला असून, त्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली असल्याची जी भीती व्यक्त करण्यात येत आहे, त्यासंबंधी बोलताना शिरोडकर यांनी ही भीती निरर्थक असल्याचे काल स्पष्ट केले.

राज्यातील धरणांत आवश्यक तेवढा जलसाठा असून, हे पाणी जून महिन्याच्या मध्यापर्यंत पुरेल एवढे असल्याचे शिरोडकर म्हणाले.
ज्या साळावली धरणातून संपूर्ण दक्षिण गोव्याला पाण्याचा पुरवठा केला जातो, त्या धरणात 11,785 हेक्टर मीटर्स एवढे पाणी असून ते पुढील 130 दिवस पुरेल एवढे आहे. तिळारी धरणातील पाणी हे पुढील 144 दिवस पुरेल एवढे आहे. काणकोण तालुक्यातील चापोली धरणातील पाणी हे 450 दिवस पुरेल एवढे आहे. आमठाणे धरण हे एक पंपिंग स्टेशन असून, त्यामुळे तेथील पाण्याचा स्तर हा सतत बदलत असतो, अशी माहिती शिरोडकर यांनी यावेळी दिली.

अंजुणे धरणात मात्र कमी जलसाठा आहे. ह्या धरणात असलेले पाणी हे पुढील फक्त 60 दिवस पुरेल एवढे आहे. मात्र, पुढील दोन महिन्यांत अधूनमधून थोडासा जरी पाऊस पडला तर ह्या धरणातील पाण्याची पातळीही वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

म्हादईच्या संयुक्त पाहणीची मागणी मान्य

म्हादई नदीच्या पात्राची संयुक्तपणे तपासणी केली जावी, ही गोवा सरकारची विनंतीवजा मागणी ‘म्हादई प्रवाह प्राधिकरणा’ने (म्हादई : प्रोगेसिव्ह रिव्हर ऑथॉरिटी फॉर वॉटर अँड हार्मनी) मान्य केली आहे, अशी माहिती काल जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही संयुक्त पाहणी कधी केली जावी त्यासाठीची तारीख गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र राज्याने कळवावी, असेही प्रवाहने तिन्ही राज्यांना कळवले आहे, असेही शिरोडकर म्हणाले. दोन दिवसांपूर्वीच गोव्यालाही प्रवाहने तारीख कळवण्यासंबंधी सांगितले आहे, असेही ते पुढे म्हणाले.

गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादई नदीचा प्रवाह कर्नाटकच्या दिशेने वळवण्यासाठी काम करणाऱ्या कर्नाटक राज्याने आता पावसाचे जे पाणी जाऊन म्हादई नदीला मिळत असते, त्या पाण्याचा प्रवाहही कर्नाटकच्या दिशेने वळवण्यासाठीचे काम हाती घेतल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कणकुंबी येथे कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र ह्या राज्यांच्यावतीने एक संयुक्त पाहणी केली जावी, अशी मागणी करणारे एक पत्र आम्ही म्हादई ‘प्रवाह’ला लिहिले होते. आणि ‘प्रवाह’ने आमची ही मागणी मान्य केली असून हे पाहणी कुठच्या तारखेला केली जावी ते सांगा असे कळवणारे पत्र गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्याना लिहिले असल्याचे शिरोडकरांनी स्पष्ट केले.