राज्यातील संचारबंदीत आणखी वाढ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

0
84

राज्यात आलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा काळ १२ जुलैनंतर आणखी वाढवण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते, असे संकेत काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. संचारबंदीचा काळ येत्या १२ जुलै रोजी संपत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या ९ मे रोजी संचारबंदी लागू करण्यात आली होती. नंतर कित्येक वेळा ह्या संचारबंदीत वाढ करण्यात आली होती. मागच्यावेळी वाढवण्यात आलेली संचारबंदी आता १२ जुलै रोजी संपणार असून परत एकदा या संचारबंदीत वाढ करण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र, संचारबंदीत आणखी थोडी शिथीलता आणली जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट हाताळण्यासाठी राज्य सज्ज असल्याचे सावंत यांनी काल स्पष्ट केले. या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी तज्ज्ञांची समिती कार्यरत झाली असून आवश्यक ती पायाभूत सुविधा उभारण्याचे काम चालू असल्याचे ते म्हणाले.
राज्यातील संसर्गाची टक्केवारी ही ३ ते ४ टक्क्यांच्या आसपास आहे. त्याशिवाय अजूनही रोज ३ ते ४ मृत्यू होत आहेत. त्यामुळे सरकार संचारबंदी आणखी वाढवू शकते असे संकेत मुख्यमंत्र्यानी दिले.