राज्यातील विविध तलावांचे लवकरच सुशोभीकरण ः सोपटे

0
106

केंद्र सरकारच्या ग्रामीण पर्यटनाला चालना देण्याच्या योजनेखाली गोव्याला करोडो रुपयांचा निधी मिळणार आहे. या योजनेखाली राज्यातील विविध तलावांच्या शुभोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.
वरील योजनेखाली करमळी तलावाच्या शुशोभीकरणासह, कुडचडे, कुडतरी आदी ठिकाणच्या तलावांच्या सुशोभीकरणाचे कामही हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विविध राज्यांच्या पर्यटन मंत्र्यांची नवी दिल्ली येथे जी बैठक झाली त्या बैठकीला आपण हजर होतो. सदर बैठकीत गोव्याच्या ग्रामीण पर्यटनाविषयी आपण चर्चा केल्याचे ते म्हणाले.

साळावली येथे गार्डन
बोंडला येथे एक सुंदर असे गार्डन उभारण्यात येणार असून त्यावर ५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहितीही सोपटे यांनी दिली. गोव्याच्या ग्रामीण पर्यटनाविषयी आपण केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याशी चर्चा केलेली असून त्यांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिल्याचे सोपटे यांनी नमूद केले.

जुने गोवे चर्चसाठी दीडशे कोटी रुपये
केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेखाली जुने गोवे येथील चर्चची दुरुस्ती व सुशोभीकरण यासाठी केंद्र सरकारकडून राज्याला १५० कोटी रुपये एवढा निधी मिळणार आहे.

साळावली येथे गार्डनचा प्रस्ताव
म्हैसूर येथील वृंदावन गार्डनच्या धर्तीवर साळावली येथे एक सुंदर असे गार्डन उभारण्यासाठीचा प्रस्तावही केंद्र सरकारपुढे ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी निधी मिळवण्यात येणार असल्याचे सोपटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोलवा किनार्‍यासाठी १५० कोटी
कोलवा किनार्‍याची ‘आयकॉनिक बिच’ म्हणून निवड करण्यात आलेली आहे. ह्या किनार्‍यासाठी केंद्राकडून राज्याला १५० कोटी रुपये मिळणार आहे. आग्वाद किल्ल्यासाठी केंद्राकडून निधी मिळालेला असून त्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू झाले असल्याची माहिती सोपटे यांनी पुढे बोलताना दिली. जसा जसा केंद्राकडून निधी वितरित होईल, त्यानुसार ही विकासकामे हाती घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

मये तलावासाठी ५० कोटी
मये तलावाच्या सुशोभीकरणासाठी आपण केंद्राकडे ५० कोटी रुपयाची मागणी केली असल्याची माहिती सोपटे यांनी यावेळी दिली. हा निधी मिळाल्यानंतर मयेच्या तलावाचे पूर्णपणे सुशोभीकरण करण्यात येईल.