राज्यातील खाण व्यवसायाच्या नव्या नांदीसह सरले वर्ष

0
6

२०२२ या वर्षाला आज निरोप देत, उद्या आपण सर्वजण नववर्ष २०२३ चे जल्लोषात स्वागत करणार आहोत. सरते वर्ष २०२२ हे गोव्यासाठी विविध कारणांनी सर्वांच्या लक्षात राहणार असून, या सरत्या वर्षातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणे यानिमित्ताने महत्त्वाचे ठरते. गोवा विधानसभा निवडणुकीपासून फुटीर आमदारांच्या घाऊक पक्षांतरापर्यंत, जमीन घोटाळ्यापासून खाण व्यवसायाच्या नव्या प्रारंभापर्यंत, सोनाली फोगट मृत्यू प्रकरणापासून अमलीपदार्थांच्या सुळसुळाटापर्यंत आणि मोप विमानतळाच्या उद्घाटनापासून नव्या झुआरी पुलाच्या लोकार्पणापर्यंत हे वर्ष सर्वांसाठी अविस्मरणीय ठरले. याच वर्षातील विविध घटनांचा घेतलेला मागोवा…
खाण व्यवसाय
राज्यात गेली कित्येक वर्षे बंद असलेला खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राज्य सरकारच्या खाण खात्याने डिसेंबरमध्ये पहिल्या टप्प्यातील चार खाणपट्‌ट्यांच्या लिलावाची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्यामुळे येत्या पावसाळ्यानंतर कायदेशीर खनिज व्यवसाय सुरू होण्याची शक्यता आहे. चार खाणपट्‌ट्यांच्या यशस्वी लिलावामुळे सरकारी तिजोरीत चांगला महसूल जमा होणार आहे.

भाजपची तिसर्‍यांदा सत्ता
सरत्या २०२२ या वर्षात फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने काठावरील बहुमत मिळवून मगोप आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा घेऊन तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करण्यात यश मिळविले. मुख्यमंत्रिपदी डॉ. प्रमोद सावंत यांची निवड झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर वर्ष २०१९ मध्ये राज्याच्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली होती, त्यावेळी विरोधकांकडून डॉ. सावंत यांना ‘अपघाती मुख्यमंत्री’ असे म्हटले जात होते. तथापि, वर्ष २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी डॉ. प्रमोद सावंत यांची निवड झाल्यानंतर आता, मी ‘अपघाती मुख्यमंत्री’ नाही, आपण अल्पावधीतच नेतृत्त्व सिद्ध करून दाखविले आहे, असे डॉ. सावंत यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

आमदारांचे घाऊक पक्षांतर
राज्यात सरत्या वर्षात पक्षांतराच्या आणखी एका धक्कादायक राजकीय घटनेची नोंद झाली. कॉंग्रेसच्या आठ आमदारांनी पक्षापासून फारकत घेत भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी वर्ष २०१९ मध्ये कॉंग्रेस, मगोप मिळून एकूण १२ आमदारांनी पक्षांतर केले होते.

मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ
राज्यातील मोप येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. सरत्या वर्षात या विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटात करण्यात आले. या मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी संरक्षणमंत्री तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून येत्या ५ जानेवारीपासून विमानसेवा प्रारंभ होणार आहे.

नवा झुआरी पूल
राज्यातील उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणार्‍या झुआरी नदीवरील नवा पुलाच्या एका भागाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या पुलामुळे आगशी, कुठ्ठाळी या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सुटली आहे. तसेच, जुन्या झुआरी पुलावरील ताण कमी होण्यास मदत झाली आहे.

जमीन घोटाळा प्रकरण
सरत्या वर्षात बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप प्रकरणे उघडकीस आल्याने खळबळ उडाली. राज्य सरकारने बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप प्रकरणाच्या चौकशीसाठी खास एसआयटीची स्थापना केली. बार्देश तालुक्यात सर्वाधिक जमीन हडप प्रकरणाची नोंद झाली. या प्रकरणी बार्देशचे तत्कालीन मामलेदार राहुल देसाई, तीन सरकारी कर्मचारी मिळून २० जणांना अटक करून जामिनावर सुटका करण्यात आली. या जमीन हडप प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना केली आहे.

अभिनेत्री सोनाली फोगट मृत्यू प्रकरण
राज्यात घडलेले हरयाणातील भाजप नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट मृत्यू प्रकरण देशपातळीवर गाजले. अमलीपदार्थाच्या अतिसेवनामुळे सोनाली फोगट यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सीबीआयने चौकशी करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या मृत्यू प्रकरणानंतर राज्यात अमलीपदार्थांच्या विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम सुरू करून अनेकांच्या मुसक्या आवळल्या.

कोरोना नियंत्रणात
सरत्या २०२२ या वर्षात राज्यातील कोरोना महामारीची परिस्थिती पूर्ण नियंत्रणाखाली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली. त्यामुळे व्यापारी आस्थापने, कंपन्यांचे कारभार पुन्हा एकदा सुरू झाले. कोरोना महामारीमुळे पसरलेले भीतीचे वातावरण या वर्षात दूर झाले.