राज्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य : पार्सेकर

0
74

पर्रीकरांसह दिल्लीला रवाना
केंद्रीय मंत्री म्हणून आज नवी दिल्लीत शपथ घेणार असलेले गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे काल नव्या मंत्रिमंडळाच्या शपथग्रहण सोहळ्यानंतर नवी दिल्लीकडे रवाना झाले. नवी दिल्लीत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पार्सेकर यांनी शपथग्रहण सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या सर्वांगीण विकास व स्वच्छ प्रशासनाला आपले प्राधान्य राहील, असे ते म्हणाले.मुख्यमंत्री या नात्याने राज्याला स्वच्छ प्रशासन देणे, सामाजिक योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचवणे व राज्याचा सर्वांगीण विकास घडवून आणणे या गोष्टींना आपण प्राधान्य देणार असल्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल शपथविधी सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. मनोहर पर्रीकर यांनी राज्यात ज्या विविध योजना सुरू केल्या होत्या त्या योजना पुढे नेण्यास आपणास आवडेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण मुख्यमंत्री असलो तरी आपण कधीही एखादा निर्णय एकटा घेणार नसून मंत्रिमंडळाला विश्‍वासात घेऊन ते काम करणार असल्याचे ते म्हणाले.
पर्रीकरांच्या शपथविधीस उपस्थिती
आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असून यावेळी मनोहर पर्रीकर हे केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेणार असून या सोहळ्याला आपण हजर राहणार आहे. सोमवारी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेणार आहे. कुठच्या मंत्र्याना कुठली खाती देण्यात येतील, मंत्र्यांकडे जी पूर्वी खाती होती तीच त्यांना परत देण्यात येतील काय, मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे अर्थ, गृह, खाण आदी काही महत्वाची खाती होती. ही खाती स्वतःकडे ठेवणार आहात का, असे पत्रकारांशी विचारले असता ते म्हणाले की, आपण त्यापैकी काही खाती अन्य मंत्र्यांकडे सोपवणार आहे. येत्या १४ रोजी आपण मनोहर पर्रीकर यांच्याशी याविषयी चर्चा करून मंत्रिमंडळ विस्तारावेळी खाते वाटप करणार आहे. अन्य मंत्र्यांना कुठली खाती द्यावी, त्यांची खाती बदलावीत की ती पूर्वी होती तीच ठेवावीत त्यासंबंधीचा निर्णय सर्वजण मिळून घेणार असल्याचे ते म्हणाले. तोपर्यंत ही खाती आपल्याकडेच राहतील असे त्यांनी स्पष्ट केले.