राज्यसभेत कॉंग्रेसच्या पाठिंब्याने विमा विधेयकावर शिक्कामोर्तब

0
100

तृणमूलसह डाव्यांचा सभात्याग
लोकसभेत बुधवारी संमत झालेले विमा विधेयक काल कॉंग्रेसच्या पाठबळामुळे राज्यसभेतही आवाजी मतदानाने संमत करण्यात आले. विमा क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण २६ वरून ४९ टक्क्यांवर नेण्याची तरतूद या विधेयकात आहे.
राज्यसभेत सत्ताधारी गटाला बहुमत नसल्याने या सभागृहात कॉंग्रेसचे समर्थन मिळाल्यामुळे हे विधेयक संमत होऊ शकले. कॉंग्रेसने समर्थन दिले असले तरी तृणमूल कॉंग्रेस, जदयू, बसप व द्रमुक या पक्षांच्या सदस्यांनी जोरदार विरोध करीत सभात्याग केला.हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले त्यावेळी आधीच प्रलंबित असलेल्या विधेयकावरून विरोधी खासदारांनी हरकत घेतली. अखेर अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सरकारच्या वतीने प्रलंबित विधेयक मागे घेतल्यानंतर नव्या विधेयकावर चर्चा होऊ शकली. तसेच डाव्या पक्षांनी आणलेल्या दुरुस्त्या ८४ विरुद्ध १० अशा मतांनी फेटाळल्यानंतर नवीन विधेयक संमत झाले.
कॉंग्रेसबरोबरच अभाअद्रमुक, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बिजू जनता दल, शिवसेना व अकाली दल यांचाही पाठिंबा या विधेयकाला लाभला.
विमा विषयक मूळ विधेयक २००८ साली कॉंग्रेसने मांडले होते. नवे विधेयक काल संध्याकाळी मांडल्यानंतर त्यावर सुमारे अडीच तास चर्चा झाली. तृणमूल कॉंग्रेस व डाव्या पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला. गेल्या ४ रोजी हे विधेयक लोकसभेत संमत झाले होते.