राज्यभरात आज राष्ट्रीय पंचायत राज दिवस कार्यक्रम

0
114

गोवाभरात आज राष्ट्रीय पंचायती राज दिवस साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्त महिला व बालकांसह विविध घटकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पंचायत संचालक अजित पंचवाडकर यांनी दिली.
‘स्वप्नांतले आमचें नितळ गोंय’ ही आज होणार असलेल्या राष्ट्रीय पंचायतीदिनाची संकल्पना आहे. त्याशिवाय प्रत्येक पंचायतीत आज विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे.

पंचायती राज दिनानिमित्त आज गोवाभरातील पंचायती तसेच नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पंचवाडकर यांनी दिली. राज्यभरातील पंचायतीत आज बालसभांचे आयोजन करण्यात येणार असून यावेळी मुलांना पुढील २० वर्षांच्या काळात तुमच्या गावात नेमका काय विकास झालेला तुम्हाला हवा आहे हे विचारण्यात येणार आहे. १३ वर्षापर्यंतच्या मुलांना ह्या बालसभेत भाग घेता येणार आहे.

विशेष ग्रामसभा
पंचायती राज दिनानिमित्त आज प्रत्येक पंचायतीत विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता सुरू होणार असलेल्या या ग्रामसभांत पुढील ५ वर्षांसाठीच्या विकास योजनांवर चर्चा होणार आहे.