मयेत बंगी जम्पिंग लवकरच : काब्राल

0
117

मये येथील सौंदर्यीकरण केलेल्या तलावाचे उद्घाटन पुढील आठवड्यात केले जाणार आहे. या ठिकाणी ५६ मीटर उंचीची बंगी जम्पिंगची सुविधा सप्टेंबर अखेरपर्यंत उपलब्ध केली जाणार आहे. तसेच मये तलाव परिसराचा ‘थिम पार्क’ च्या धर्तीवर विकास करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा आमदार नीलेश काब्राल यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. सर्वच उपक्रम पीपीपी तत्त्वांवर चालविण्यात येत आहेत. मये तलावात बोटिंगसाठी नवीन बोटी आणण्यात आल्या आहेत. तसेच याठिकाणी ५६ मीटर उंचीची बंगी जम्पिंगची सुविधा उभारण्याचा प्रस्ताव असून सप्टेंबर अखेर हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. बंगी जम्पिंग ही देशातील दुसर्‍या क्रमांकांची सुविधा ठरणार आहे. मये येथे पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी आगळ्या वेगळ्या पद्धतीच्या थीम पार्कचा प्रस्तावावर विचार केला जात आहे.

या प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी आवश्यक आहे, असेही काब्राल यांनी सांगितले. केपे तालुक्यातील बेतूल येथे फूड पार्क, सी पार्कची सुविधा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रकल्प सुध्दा पीपीपी तत्त्वावर उभारला जाणार आहे. महामंडळाच्या कोलवा, म्हापसा, वास्को येथील रेसिडेन्सीची दुरुस्तीचा प्रस्ताव आहे, असेही काब्राल यांनी सांगितले. मये येथील तलावाच्या ठिकाणी स्थानिकांना रोजगार सुविधा मिळवून देण्यास प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. मये तलावाच्या ठिकाणी स्थानिकांना गाडे वजा दुकाने सुरू करण्यास प्राधान्य द्यावे, अशी स्थानिकांची मागणी आहे, असेही काब्राल म्हणाले.

दरम्यान, मयेचे माजी सरपंच सुभाष किनळेकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने महामंडळाचे अध्यक्ष काब्राल यांची भेट घेऊन स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याबाबतचे निवेदन सादर केले.