गोवा डेअरीवर प्रशासक नियुक्त करा

0
136

>> चौकशी समितीची मागणी

गोवा डेअरीच्या संपूर्ण व्यवहारात चौकशी करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याची मागणी गोवा डेअरीच्या चौकशी समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद सावर्डेकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेस विकास प्रभू, वैभव परब, जयंत देसाई व रमेश नाईक उपस्थित होते. गोवा डेअरीचे अध्यक्ष माधव सहकारी यांनी व्यवस्थापकीय संचालक नवसो सावंत याना निलंबित केले होते. त्यामुळे दुसर्‍याच दिवशी ८ संचालकांनी अध्यक्षांविरुद्ध अविश्वास दाखल केला होता. समितीने चौकशी करण्याची सुरुवात केली तेव्हा अध्यक्ष माधव सहकारी यांनी गोवा डेअरीत कोणताच घोटाळा होत नसल्याचे म्हटले होते.

मात्र संचालक विजय कुमार पाटील याना अपात्र केल्यानंतर अध्यक्षांनी व्यवस्थापकीय संचालका विरुद्ध पुरावे असल्याचे दाखवून निलंबित केले होते. नवसो सावंत व राधिका काळे याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. राधिका काळे यांनी ७ वर्षे नोकरी करून ३० लाख रुपये कर्ज घेतले आहे. नियमानुसार १० वर्षे नोकरी केलेल्या अधिकार्‍यांना कर्ज देण्यात येते.
मंगळवारी गोवा डेअरीच्या समोर राज्यातील दूध उत्पादक बैठक घेणार असून सुमारे १ हजार उत्पादक उपस्थित राहणार आहेत.