विधानसभेचे अधिवेशन घेऊन लवकरच विधानसभा बरखास्त होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री दिगंबर कामत काल संध्याकाळी दिल्लीहून परतले, तर प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर दिल्लीत तळ ठोकून होते. आज ते गोव्यात परततील. शिरोडकर यांच्याशी संपर्क केला असता, ब्रार यांच्या गोवा भेटीची कल्पना नाही, परंतु परवा आपण कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल, गोव्याचे प्रभारी ब्रार, सचिव सुधाकर रेड्डी यांची भेट घेऊन गोव्यात कॉंग्रेस बळकट करण्यावर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
पाटणेकर, सोपटे यांचा कॉंग्रेस प्रवेश कधी होणार, असे विचारले असता सध्या नाही, असे ते म्हणाले. असे असले तरी पाटणेकर यांना ३० रोजी कॉंगेस प्रवेश देण्याचे घाटत आहे, असेही सांगण्यात येत आहे.
सध्या राजकीय वातावरण तापल्याने त्याचा फायदा घेऊन नेतृत्व बदलासाठीही प्रयत्न सुरू असून त्यासाठी सभापती प्रतापसिंह राणे यांच्या नावाबरोबरच गृहमंत्री रवी नाईक यांच्याही नावावर चर्चा सुरू झाली आहे.
नेतृत्वबदलाचा प्रश्नच नाही : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष
सध्या राज्यात तापलेल्या राजकीय वातावरणाच्या तसेच नेतृत्व बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी काल सांगितले की राज्यात नेतृत्व बदलाचा कसलाच विषय विचाराधीन नाही.