राजकीय पक्ष म्हणून गोवा फॉर्वर्डला मान्यता

0
89

भारतीय निवडणूक आयोगाने ‘गोवा फॉरवर्ड’ पक्षाची राजकीय पक्ष म्हणून नोंदणी केली असल्याचे फातोर्डा मतदारसंघाचे अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी काल सांगितले. आता लवकरच पक्षाला चिन्हही प्राप्त होणार असल्याचेही ते म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पक्ष आता जोमाने कामाला लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्याला अशा एका प्रादेशिक पक्षाची गरज होती. गोव्यातील जनता दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या राजकारणाला विटलेली आहे. आम्ही राज्यातील जनतेला या नवी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या राजकारणापासून मुक्ती देण्याचा विचार चालवला आहे, असे सरदेसाई यांनी नमूद केले. लोकांना नेमके काय हवे आहे हे एकदा कळले की आम्ही त्यानुसार आमचा कार्यक्रम आखणार असल्याचे ते म्हणाले. गोवा फॉरवर्ड पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक काल मडगावात झाली.
माड चिन्हास पसंती
दरम्यान, माड हेच पक्षाचे चिन्ह म्हणून घेण्यास पक्षाचे नेते व पदाधिकारी यांची पसंती असल्याचे वृत्त आहे. राज्यातील माड कापणे सोपे व्हावे यासाठी सरकार कायद्यात बदल करू पाहत असल्याचा दावा करून गोवा फॉरवर्डने माड वाचवण्यासाठी राज्यात आंदोलनही केले होते.