पणजी स्मार्ट सिटीसाठी खास कंपनी

0
84

>>‘इमेजिन स्मार्ट सिटी कंपनी

>>वित्त सचिव सुधीर महाजन कंपनीचे अध्यक्ष

पणजी स्मार्ट सिटीसाठी स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) स्थापन करण्यास केंद्राकडून पणजी महापालिका व जीएस्‌आय्‌डीसीला परवानगी मिळाली असल्याचे पणजीचे आमदार तथा जीएस्‌आय्‌डीसीचे उपाध्यक्ष सिध्दार्थ कुंकळ्येकर व पणजी महापालिकेचे आयुक्त दीपक देसाई यांनी काल येथे घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. ‘इमेजिन स्मार्ट सिटी’ या नावाने ही कंपनी स्थापन करण्यात आली असून कंपनीचे ४० टक्के भागभांडवल हे गोवा सरकारचे, ४० टक्के पणजी महापालिकेचे तर अन्य प्रत्येकी १० टक्के भागभांडवल हे ईडीसी व जीएस्‌आय्‌डीसीचे असल्याचे सांगण्यात आले.
अर्थ सचिव सुधीर महाजन हे या कंपनीचे चेअरमन तर ईडीसीच्या आर्थिक विभागाचे प्रमुख स्वायत्त दत्त पाल हे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. संचालकपदी दौलत हवालदार, एल्विस गोम्स, उत्तम पार्सेकर, दीपक देसाई व अरविंद घाटकर हे असतील. याशिवाय या कंपनीचे एक सल्लागार मंडळही स्थापन करण्यात येणार आहे.
लोगोसाठी स्पर्धा
दरम्यान, कंपनीचा लोगो तयार करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून २५ हजार, १५ हजार व १० हजार अशी अनुक्रमे तीन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्याचबरोबर रूआ द औरें, जुना पाटो पूल व मळा तलाव या तीन जंक्शनांचा आराखडा तयार करण्यासाठीही स्पर्धा आयोजित केलेली असून अनुक्रमे १ लाख रु, ३० हजार रु. व २० हजार रु. अशी तीन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.