राजकीय आरक्षण न दिल्यास भाजपविरोधात उतरणार

0
18

>> अखिल गोवा एसटी समाजाचा महामेळाव्यात ठराव

>> लोकसभा निवडणुकीपूर्वी अध्यादेश काढण्याची मागणी

लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जर केंद्राने अधिसूचना काढून एसटी समाजाला राजकीय आरक्षण दिले नाही तर लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपविरोधात काम करण्याचा ठराव काल अनुसूचित जमातींच्या विविध संघटना व नेत्यांच्या आझाद मैदानावर झालेल्या महामेळाव्यात घेण्यात आला. त्याचबरोबर सरकार वेळोवेळी खोटी आश्वासने देऊ एसटी समाजाला आरक्षण देण्याकडे कसा काणाडोळा करीत आहे त्याची माहिती एसटींच्या 300 गावात जाऊन तेथील लोकांना देण्याचाही ठराव महामेळाव्यात घेण्यात आला. तत्पूर्वी एसटींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून आझाद मैदानावर चालू असलेले साखळी उपोषण मागे घेण्याचा निर्णयही महामेळाव्यात घेण्यात आला.

येत्या काही दिवसांत होणार असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी गोवा विधानसभेचे चार मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी आरक्षित करण्याची अधिसूचना सरकारने काढावी आणि जर ती सरकारने काढली नाही तर लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे नुकसान करण्यासाठीचे डावपेच आखण्याचा ठराव यावेळी एकमताने संमत करण्यात आला. त्याचबरोबर राज्यभरात एसटी समाजाचे बहुमत असलेले जे 300 गाव आहेत त्या गावात जाऊन सरकार एसटींना त्यांचे हक्काचे राजकीय आरक्षण देण्याच्याबाबतीत त्यांची कशी फसवणूक करीत आहे ते तेथील लोकांना जाऊन सांगण्याचा ठरावही यावेळी संमत करण्यात आला.

साखळी उपोषण मागे
गेल्या 6 मार्चपासून पणजी येथील आझाद मैदानावर सुरू असलेले साखळी उपोषण मागे घेण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
यावेळी एसटी समाजातील नेते, गावागावातील राजकीय कार्यकर्ते, समाजिक कार्यकर्ते, एसटींच्या विविध संघटनांचे सदस्य, क्रीडा व महिला संघटनांचे सदस्य आदी हजर होते.

केंद्रीय मंत्रिमंडळाने यावेळीही राजकीय आरक्षणाच्या बाबतीत एसटी समाजाची फसवणूक केल्याची माहिती यावेळी समाजाच्या नेत्यांनी समाजबांधवांना दिली. केंद्राने फक्त या आरक्षणासंबंधीच्या विधेयकाच्या मसुद्याला मान्यता देऊन एसटींच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचा आरोप नेत्यांनी महामेळाव्यातून केला.
महामेळाव्याला युवक, मध्यमवर्गीय व वयोवृद्ध महिला व पुरुष मोठ्या संख्येने हजर
होते.