Home बातम्या रत्नाकर मतकरींचा सार्थ सन्मान

रत्नाकर मतकरींचा सार्थ सन्मान

0

– दीपक विष्णू ङ्गडके, आंबेगाळ- पाळी- गोवा

विष्णूदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक. १८४३ साली त्यांनी ‘सीतास्वयंवर’ हे नाटक सर्वप्रथम रंगमंचावर आणले. अशा या मराठी रंगभूमीचा पितामह असलेल्याच्या नावे सांगली येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने दरवर्षी प्रतिष्ठेचा विष्णूदास भावे गौरव पदक ज्येष्ठ रंगकर्मीला ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनी देण्यात येते. आजपर्यंत रंगभूमीची विविध माध्यमांद्वारे सेवा बजावलेल्यांना हे मौल्यवान पदक लाभले. त्यात बालगंधर्व, आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे आदींचा समावेश आहे. अगदी अलीकडचेच सांगायचे झाल्यास रामदास कामत, सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर, नाटककार शं.ना. नवरे आदींना भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. यंदा तो मान सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक तथा रंगकर्मी रत्नाकर रामकृष्ण मतकरी यांच्या वाट्याला आला आहे.

मराठी रंगभूमीच्या इतिहासाला एक महान परंपरा आहे. विष्णुदास भावे, अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्यासारख्या जनकापासून ते नंतरच्या प्रत्येक नाट्यकलाकारापासून नाट्यलेखकापर्यंत रंगभुमीवरचे ज्याचे त्याचे योगदान अमूल्य असेच आहे. मराठी रंगभूमीला प्रारंभीच्या काळात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, मामा वरेरकर, वसंत शांताराम देसाई यांच्यासारखे नाटककार, तर बालगंधर्व, माधवराव वालावलकर यांच्यासारखे नट लाभले. त्यानंतरच्या काळात नाटककार विद्याधर गोखले, वसंत कानेटकर यांच्यासारखे नाटककार, तर पंडित राम मराठे, पंडित प्रभाकर पणशीकर यांच्यासारखे श्रेष्ठ दर्जाचे नट मराठी रंगभूमीने प्रेक्षकांसमोर पेश केले. प्रारंभीचा आणि मध्यंतरीचा एक काळ असा होता की, त्यावेळी हौशी रंगभूमी तसेच व्यावसायिक रंगभूमी दोन्ही स्तरांवर भरभराटीचे दिवस होते. नाटक लिहिणारे व ते सादर करणारे कलाकार आणि पाहाणारे प्रेक्षक तेव्हढ्याच ताकदीचे असायचे. मनोरंजनाचे दुसरे साधन नसल्यामुळे नाटके पहाटे-पहाटेपर्यंत चालायची. आज ती नाटके पेलणारे कलाकारही विरळाच व ते प्रेक्षकही कमीच! त्यामुळे तानसेन आणि कानसेनच्या कमतरतेमुळे आज एकांकीका, ङ्गार्सिकल पॅटर्नच्या प्रयोगांची मागणी वाढू लागली आहे. याचा अर्थ आपले पूर्वीचे नाट्यसंचित कुठेही कमी आहे, अशातला भाग नाही. ते तर एकदम श्रेष्ठतम दर्जाचे व आपल्या रंगभूमीचे अमूल्य असे संचित आहे. अशा वळणावर रत्नाकर मतकरी, सुरेश खरे, दिलीप प्रभावळकर, प्रशांत दामले, शरद पोंक्षे यांच्यासारखे नाटककार आणि नाट्यकलाकार आजच्या मागणीला पूरक असेच आहेत. त्यामुळे रत्नाकर मतकरी यांच्यासारखे विविधांगी छटा लाभलेले व्यक्तीमत्त्व विष्णुदास भावे पुरस्कारासाठी सर्वार्थाने योग्य असेच आहेत. वडील रामकृष्ण मतकरींसारख्या साहित्यिकाचा वारसा लाभलेले रत्नाकर मतकरी अर्थशास्त्रातले पदवीधर, जवळजवळ वीस वर्षे त्यांनी बँकेमध्ये आकडेरूपी खेळ खेळला. त्यानंतर म्हणजे, साधारणतः १९७८ पासून त्यांनी स्वतःला पूर्णतः लेखक, दिग्दर्शक तथा निर्माता म्हणून वाहून घेतले. एकांकीका, कथा, कादंबरी, वृत्तपत्रातील विविध सदरे, लहान मुलांसाठी साहित्य, लघुकथा, नाटके आदी साहित्य प्रकाराबरोबरच मतकरी यांनी स्वतः अनेक नाटकात विविध भूमिकाही वठवल्या आहेत. गूढकथा किंवा रहस्यकथा हा साहित्यप्रकार मराठीच त्यांनीच प्रथम बहराला आणला. श्री. मतकरींनी भरभरून लेखन केले आहे. दुभंग, अरण्यक, साटेलोटे, अश्वमेघ, जावई माझा भला, चार दिवस प्रेमाचे, ब्रह्महत्या यासारखे लिखाण मतकरींची सिद्धहस्त लेखणी सिद्ध करते, तर अलबत्या-गलबत्या, निम्मा सिम्मा राक्षस यासारखे बालसाहित्य लहान मुलांना एका वेगळ्या आनंद विश्‍वात घेऊन जाते. मतकरींच्या चार दिवस प्रेमाचे या साहित्यकृतीनंतर उच्चांकाचे उचांक गाठले आहेत. त्या साहित्यकृतीचे अनेक भाषात अनुवादनही झाले आहे. श्री. मतकरींनी रेडिओ तथा दूरदर्शनसाठीही विपुल लेखन केले आहे. मुंबई दूरदर्शनवरील शरदाचे चांदणे ही मराठीतील काही प्रख्यात साहित्यिकांच्या मुलाखतींची मालिका विशेष गाजली होती. या शिवाय त्यांनी आपल्या नाटकांचे प्रयोग मस्कत, अमेरिका येथेही केले आहेत. दूरदर्शनच्या मालिकांचे लिखाण करण्याबरोबरच निर्माता, दिग्दर्शन, भाषांतर आदी क्षेत्रात मुक्त संचार करीत श्री. मतकरी बालनाट्य चळवळीकडेही तेव्हढ्याच उत्सुकतेने वळले. १९६२ साली त्यांनी बालनाट्य संस्थेची स्थापना करून बालकांसाठी जवळजवळ २२ प्रयोगांची निर्मिती त्यांनी केली. आज त्यांच्या नावावर अगणित अशा संख्येने मराठीतील सर्व प्रकारचे साहित्य असून त्यांच्या या कामगिरीची पावती म्हणून विविध मानसन्मान त्यांच्या वाट्याला आलेत. कोंकण मराठी साहित्य संमेलन, बालकुमार साहित्य संमेलन, पुणे, आदींच्या मानाधिकार्‍यांच्या जागा त्यांना प्राप्त झाल्या. ऑल इंडिया रेडिओ तसेच ङ्गिल्म सेन्सॉर बोर्डाच्या केंद्रीय समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. या शिवाय भारत सरकारच्या शैक्षणिक तथा सांस्कृतिक संचालनालयातर्ङ्गे त्यांना शिष्यवृत्तीही प्राप्त झाली आहे.

दादासाहेब ङ्गाळके पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा देवल सन्मान, अत्रे ङ्गौंडेशन पुरस्कार, वि.वा.शिरवाडकर पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार आणि विशेष म्हणजे २००३-४ सालचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांच्या शिरपेचात खोवला गेला आहे. आज विष्णूदास भावे गौरवपदक त्यांच्या वाट्याला आले. आणखी अनंत काळ रत्नाकर मतकरींच्या पुढे आहे. या काळात त्यांच्या हातून उत्तमोत्तम साहित्य निर्मिती होवो व त्यांना अखिल भारतीय नाट्य संमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलन यांचे अध्यक्षपद लाभो, इतकेच काय ज्ञानपीठासारखाही पुरस्कार त्यांच्या वाट्याल येवो हीच सदिच्छा….!