बिहार विधानसभा निवडणुकीत जसा भाजपचा विजय झाला तसाच विजय गोवा विधानसभा निवडणुकीतही होणार असल्याचा विश्वास काल पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पक्षाचे प्रवक्ते दामू नाईक यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा सरकारच्या कामावर राज्यातील जनता समाधानी असून २०२२ साली होऊ घातलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप सरकार परत एकदा राज्यात सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेस पक्ष केवळ प्रसिद्धीसाठी आंदोलने करीत असल्याचा आरोप करताना त्यांच्याकडे कार्यकर्तेही नाहीत आणि म्हणूनच तेच तेच नेते सर्व ठिकाणी जाऊन हातात पक्षाचा झेंडा घेऊन आंदोलने करीत असल्याचे ते म्हणाले.
कोळसा प्रकरणी आमच्यावर आरोप करणार्या कॉंग्रेस पक्षानेच जेएसडब्ल्यू, अदानी आदींचा कोळसा राज्यात आणला होता असे ते म्हणाले.
गोव्यात रेल्वे दुपदरीकरणाचा प्रस्ताव खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी मंजूर करून आणला होता, असा आरोपही तानावडे यांनी केला.
सावंत सरकार कोणत्याही परिस्थितीत गोव्याच्या पर्यावरणाचा विद्ध्वंस करणार नसल्याचे ते एका प्रश्नावर म्हणाले.