कोरोना लशीसाठी ९०० कोटींची तरतूद

0
287

>> अर्थमंत्री सीतारमण; आत्मनिर्भर भारत ३.० अंतर्गत एकूण १२ योजना

देशात कोरोनाची लस तयार करण्यावर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून लशीचे संशोधन व लशीसाठी केंद्र सरकारने ९०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे काल अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. केंद्र सरकारने यावेळी आत्मनिर्भर भारत ३.०ची घोषणा करताना एकूण १२ घोषणा केल्या. त्यामुळे आर्थिक फटका बसलेली अर्थव्यवस्था सुरळीत होण्यासा मदत होईल असे सीतारमण यांनी सांगितले.

कोरोना लशीसाठी ९०० कोटी
कोरोना महामारीवर उपाय म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या स्वदेशी लशीच्या संशोधनासाठी व लस विकसित करण्यासाठी अतिरिक्त ९०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोविड सुरक्षा मिशन अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीला ही रक्कम दिली जाणार आहे. आरोग्य मंत्रालयाअंतर्गत ही रक्क खर्च केली जाईल.

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना
आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेचे ध्येय सर्वाधिक कर्मचार्‍यांना ईपीएफओ आणि पीएफचा सर्वाधिक फायदा मिळवून देण्याचे असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. ज्या लोकांनी यापूर्वी नोंदणी केली नाही आणि ज्यांचे वेतन १५ हजारांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. जे लोक ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत कामावर नव्हते परंतु त्यानंतर पीएफशी जोडले गेले आहेत त्यांना याचा लाभ देण्यात येणार आहे. ३० जून २०२१ पर्यंत ही योजना सुरू राहणार आहे.

क्रेडिट गॅरंटी स्कीम
सरकारने आरोग्य विमा व अन्य २६ क्षेत्रांसाठी क्रेडिट गॅरेंटी स्कीम लॉंच केली. ही योजना ३१ मार्च २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे सरकारने पंतप्रधान आवास योजनेसाठी १८ हजार कोेटी रुपये उपलब्ध करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी यावेळी केली. यामुळे १२ लाख नव्या घरांच्या उभारणीला सुरूवात केली जाणार आहे आणि १८ लाख घरांचे काम पूर्ण केले जाणार आहे. अर्थमंत्र्यांनी विकासक आणि घर खरेदीदारांना कर सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारने बांधकाम आणि पायाभूत सुविधा क्षेत्राला दिलासा देण्याचा निर्णय घेतला असून या क्षेत्रातील कंपन्यांना कॅपिटल आणि बॅक गॅरंटीमध्ये दिलासा देण्यात येणार आहे. खतांवर ६५ हजार कोटींचे अनुदान दिले जाणार आहे. या शिवाय गरीब कल्याण रोजगार योजनेची तरतूद, निर्यात वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी दिली.