येत्या निवडणुकीत भाजपचा पराभव निश्‍चित

0
32

>> पी. चिदंबरम यांचा पत्रकार परिषदेत दावा

>> समविचारी पक्षांबाबत युतीचा निर्णय योग्यवेळी

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव निश्‍चित असून कॉंग्रेस पक्ष सत्तेवर येणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे असा दावा कॉंग्रेस पक्षाचे गोवा निरीक्षक पी. चिदंबरम यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला. तसेच यावेळी त्यांनी, या निवडणुकीत समविचारी पक्षांबरोबर युती करायची की काय यासाठीचा निर्णय योग्यवेळी घेण्यात येणार असल्याची माहितीही दिली. यावेळी पत्रकार परिषदेला गोवा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच गोवा कॉंग्रेस प्रभारी दिनेश गुंडूराव उपस्थित होते.

येत्या पाच सहा महिन्यांत गोव्यात होणार असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीची रणनीती तयार करण्याचे काम चालू असल्याचे ते म्हणाले. राज्यात सत्तापरिवर्तन होऊन कॉंग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर यावे असे राज्यातील जनतेचे स्वप्न आहे, असे सांगून जनतेची ही इच्छा नक्कीच पूर्ण होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेस पक्ष प्रामाणिक, निष्कलंक तसेच पक्षाशी एकनिष्ठ राहून राज्याच्या हितासाठी काम करणार्‍या व्यक्तींनाच यावेळी उमेदवारी देण्यात येणार असल्याचे चिदंबरम यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवण्यात दर एका मतदारसंघात कित्येक नेते इच्छुक असले तरी कुणाला उमेदवारी द्यायची याविषयीचा निर्णय त्या त्या मतदारसंघातील गटातल्या सक्रीय सदस्यांशी चर्चा करूनच घेण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी चिदंबरम यांनी दिली.

प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदावरून गिरीश चोडणकर यांना हटवून अन्य कुणाची वर्णी लावण्याचा विचार आहे काय, असे विचारले असता आपण येथे कुणाला हटवून त्याजागी अन्य कुणाला बसवण्यासाठी आलो नसल्याचे ते म्हणाले. असे संघटनात्मक निर्णय हे योग्यवेळी योग्य व्यक्तींकडून घेतले जातात, असे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य टाळले
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस पक्ष आपला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार आहे काय, असे विचारले असता त्याचे उत्तर देण्याचे यावेळी चिदंबरम यांनी टाळले. निवडणुकीला काही महिने बाकी असताना उमेदवार जाहीर करणार आहे का, असे विचारले असता नाही असे सांगत त्यांनी उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक तेवढा अवधी मिळेल अशा प्रकारे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

उदय मडकईकर, टोनी रॉड्रिग्स कॉंग्रेसच्या वाटेवर

पणजी महानगरपालिकेच्या दोन माजी महापौरांनी काल पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांची साथ सोडून कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यात माजी महापौर टोनी रॉड्रिग्स व उदय मडकईकर यांचा समावेश आहे.

काल गिरीश चोडणकर यांच्या उपस्थितीत पत्रकारांशी बोलताना रॉड्रिग्स व मडकईकर यांनी, बाबूश मोन्सेरात यांनी पणजी व ताळगाव येथील पक्ष समित्या स्थापन करताना आपल्याला विश्‍वासात न घेता डावलले. मोन्सेरात यांनी त्यांच्या विजयासाठी काम केलेल्या सर्वच कार्यकर्त्यांकडे पाठ फिरवली आहे. त्यांच्यासाठी आता काहीही काम न करणार्‍या लोकांना घेऊन ते फिरत असल्याचा आरोप केला.

मोन्सेरात यांना जर आम्ही नको तर त्यांचीही आम्हाला गरज नाही. आम्ही कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगून मडकईकर यांनी आम्ही पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसजनच असल्याचे सांगितले. बाबूश यांच्यामुळेच आम्हाला पुनःपुन्हा पक्ष बदलावा लागला. मात्र आता आम्ही कॉंग्रेससाठीच काम करणार असल्याचे रॉड्रिग्स यांनीही सांगितले.
टोनी रॉड्रिग्स व उदय मडकईकर हे कॉंग्रेस पक्षात येणार असल्याने पणजी व ताळगाव मतदासंघात कॉंग्रेस मजबूत होणार असल्याचे चोडणकर यांनी यावेळी सांगितले.