येत्या निवडणुकीत कॉंग्रेसची बाजी ः लोबो

0
24

>> मायकल लोबो यांचा पत्नी डिलायलासह कॉंग्रेसमध्ये प्रवेश

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला २२ पेक्षा जास्त जागा मिळतील आणि राज्यात कॉंग्रेस सरकार स्थापन करून स्थिर सरकार देईल असे मत प्रमोद सावंत सरकारमधील माजी बंदर विकासमंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले. सोमवार दि. १० रोजी आपल्या आमदारकी व मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काल मंगळवारी रितसर कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते बोलत होते.

गोव्याला योग्य दिशेने नेण्यासाठी व राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी आपण कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे त्यांनी यावेळी पुढे बोलताना सांगितले.

यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव, प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष एम. के. शेख यांच्या हजेरीत मायकल लोबो व त्यांच्या पत्नी डिलायला लोबो यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. लोबो यांच्यासह यावेळी कळंगुट मतदारसंघातील तसेच शिवोली मतदारसंघातील पंच व सरपंचांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी यावेळी, येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत गोमंतकीय कॉंग्रेस पक्षाच्या बाजूने उभे राहणार आहे. गोव्यातील जनतेला भाजप पुन्हा सत्तेवर येऊ नये असेच वाटत असल्याचे सांगितले. तसेच पुढे बोलताना कामत यांनी, जे नेते तृणमूल कॉंग्रेसमध्ये गेलेले आहेत ते तो पक्ष नक्की सोडणार असल्याचे सांगितले.

लवू मामलेदार कॉंग्रेसवासी
फोंडा मतदारसंघाचे माजी आमदार लवू मामलेदार यांनी मंगळवारी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रेस पक्षाने जेव्हा जेव्हा नोकरभरती केली तेव्हा तेव्हा ती गुणवत्तेवर आधारित केली, असे सांगितले. कॉंग्रेस पक्ष हा गोव्यातील जनतेच्या भल्यासाठी काम करीत असल्याचेही त्यांनी कॉंग्रेस प्रवेशाच्या वेळी बोलताना सांगितले.
कॉंग्रेस पक्षाच्या राजवटीत आपली पोलीस खात्यात भरती झाली होती. कुणालाही एक पैसा न देता आपणाला पोलीस खात्यात नोकरी मिळाली होती, असे ते म्हणाले.

कॉंग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष व सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून त्यामुळे मोठ्या संख्येने लोक ह्या पक्षाकडे आकर्षित होत असल्याचे मामलेदार म्हणाले. नोकरभरतीच्या प्रश्‍नावरून यावेळी मामलेदार यांनी भाजपवर टीका केली.
२००७ साली आपण उपअधीक्षकपदाचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला आणि मगो पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आल्याचे ते म्हणाले.
मगो पक्षाच्या नेत्यांबरोबर आपणाला एका व्यासपीठावर बसायचे नव्हते. म्हणून आपण तृणमूल कॉंग्रेस पक्षाला रामराम ठोकल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी बोलताना कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी, लवू मामलेदार यांचे गोव्यातील जनतेशी चांगले संबंध आहेत. आणि त्याचा फायदा कॉंग्रेस पक्षाला निश्‍चितच मिळणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

लोबोंनी मानले सोनिया,
राहुल गांधींचे आभार

यावेळी मायकल लोबो यांनी, कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी व नेते राहुल गांधी यांचे आभर मानले. आम्ही गोव्याच्या कल्याणासाठी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. गोव्यातील गरीब लोक त्रस्त आहेत. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी कोणीच नाही. बरेचजण पुन्हा कॉंग्रेसमध्ये सामील होत आहेत. कारण त्यांना माहीत आहे की, योग्य दिशेने जायचे असेल तर कॉंग्रेस हा एकमेव पर्याय आहे असे लोबो यांनी यावेळी सांगितले.

तृणमूलसोबत युतीची
चर्चा नाही ः गुंडूराव
तृणमूल कॉंग्रेससोबत युतीबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. आपण, तसेच दिगंबर कामत किंवा पक्षाचे अन्य नेते गोव्यातच असून तृणमूल कॉंग्रेस पक्षाबरोबर गोवा विधानसबा निवढणुकीसाठी कोणतीही बोलणी चालू नसल्याचे कॉंग्रेस प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी काल स्पष्ट केले.